नाशिक : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेतर्फे जय्यत तयारी केली जात आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर वाकडी बारव ते अहिल्यादेवी होळकर पुलापर्यंत तब्बल ४१ ठिकाणी बॅरेकेडींग उभारण्यात येत आहे. या खर्चाला स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घेतली जाणार आहे.
शनिवारी (दि.७) वाजत गाजत लाडक्या गणरायाचे आगमन झाले. येत्या मंगळवारी(दि.१७) अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. यासाठी जुन्या नाशकातील वाकडी बारव येथून पारंपरिक विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग निश्चित आहे. विसर्जन मिरवणूक निविघ्न पार पडावी यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसमवेत मिरवणूक मार्गाची पाहणी करत मार्ग अतिक्रमणमुक्त तसेच खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. मिरवणुकीला अडथळा होऊ नये यासाठी मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांच्या समन्वयाने ४१ ठिकाणी तात्पुरते बॅरेकेडींग उभारले जाणार आहेत. यासाठी साडेसहा लाखांचा खर्च केला जाणार आहे. सदर काम तातडीने पूर्ण करावयाचे असल्याने विनानिविदा कलात्मक मंडप डेकोरेटर्स, नाशिक यांना काम देण्यात आले आहे. या खर्चास स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घेतली जाणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशांनंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.१२) जुन्या नाशकातील विर्सजन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणांवर जोरदार कारवाई केली. मंडळांनी रस्त्यावर उभारलेले मंडपही काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
मंगळवारी (दि.१७) लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. जुन्या नाशकातील वाकडी बारव येथून पारंपरिक विर्सजन मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक विनाविघ्न पार पडण्यासाठी आयुक्त डॉ. करंजकर यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसमवेत विर्सजन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. संपूर्ण मार्ग पायी फिरत मार्गावरील खड्डे बुजविण्याचे तसेच दुकानांची अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. अतिक्रमण निमूर्लन विभागाचे उपायुक्त मयुर पाटील यांनी आयुक्तांच्या या आदेशाचे दुसऱ्याच दिवशी तातडीने पालन करत मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, दुधबाजार, दामोदर चित्रपट गृहासमोरील परिसर, संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा आदी भागातील रस्त्यावरील दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली. दुकानांसमोरील पाल, चारचाकी अतिक्रमित हातगाड्यांसह साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले. काही मंडळांनी रस्त्यावर उभारलेले मंडप मिरवणुकीला अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मंडप मंडळांनी स्वत;हून काढून घ्यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशाही उपायुक्त पाटील यांनी यावेळी दिला.
मुंबई नाक्यावरील भिकाऱ्यांवरही अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळानाका ते मुंबई नाका दरम्यान उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांनी कुटुंबासमवेत बस्तान बसविले आहे. या लोकांकडून अस्वच्छता केलीजात असून वाहतुकीसहही अडथळा निर्माण केला जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.