चांदवड : शहरातील कॉलेज रोडवर मागील भांडणाची कुरापत काढत एकाने २५ वर्षीय तरुणावर धारदार कोयत्याने हल्ला केला. तरुण रक्तबंबाळ होऊन खाली कोसळताच हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सना मोअज्जमखान पठाण (२८, रा. मुल्लावाडा) याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुल्लावाडा परिसरात फिर्यादी पठाण व घासी कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यांच्यात सातत्याने भांडणे होत असतात. त्यातून संशयित अबुजर मन्जूर घासी, मोबीन अकिल घासी व मिजान अकिल घासी या तिघांनी सोमवारी कोयता व लोखंडी रॉड हातात घेत पठाणला शिवीगाळ व दमदाटी करून निघून गेले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादीचा भाऊ अरबाज हा कॉलेज रोड येथे असताना अबुजर घासीने धारदार कोयत्याने त्याच्यावर वार करून पळ काढला. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अरबाजला नाशिकला हलविण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच दहशत पसरली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर अधिक तपास करीत आहेत.