

नाशिक : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा मिळवत बहुमताच्या जवळ पोहोचणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. त्यातच 'लाडक्या सर्व बहिणींना आता लाडका भाऊ पाहिजे, पुन्हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे पाहिजे', अशा आशयाचे फलक शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेत भाजपसोबत घरोबा केल्याने उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर महायुती निवडणुकीला सामोरे गेली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश लाभले. एकट्या भाजपला 132 जागांवर विजय मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. अशा प्रकारे महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. या उलट महाविकास आघाडीला जेमतेम 47 जागांवर विजय मिळविता आला. त्यामुळे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार हे निकालाच्या दिवशीच दि. 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट झाले होते. निकाल जाहीर होऊन आता आठवडा उलटला तरी महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मोदी, शाह यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. या सर्व राजकीय घडामोडीत शिंदे यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. ते आपल्या मूळ गावी निघून गेल्याने सत्तापदांच्या वाटपावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच नाशकात शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर झळकले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा आधार या फलकांच्या आशयात नमूद आहे. 'लाडक्या सर्व बहिणींना आता लाडका भाऊ पाहिजे, पुन्हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे पाहिजे', अशा आशयाचे फलक शहरात शिंदे गटाकडून लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्रिपदी शिंदे यांचीच निवड केली जावी, असा आग्रह या फलकांच्या आशयात दिसून येत आहे.