

देवळा (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू हे विविध मागण्यांसाठी गेले आठ दिवस अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला देवळा तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने पाठिंबा दर्शवला असून शुक्रवारी (दि.13) राेजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आले. यानंतर देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना निवेदन सादर करण्यात आले.
शासनाने बच्चू कडू यांच्या मागण्यांचा तात्काळ सकारात्मक विचार करावा, अन्यथा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला. जर त्यांना काही नुकसान झाले, तर संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचा रोष उफाळून येईल, असे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
संघटनेने सांगितले की, बच्चू कडू यांचा लढा हा मागास, वंचित, दिव्यांग, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी असून तो न्याय्य आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्या त्वरीत मान्य करून आंदोलन शांततेत मार्गी लावावे, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली.
या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख चंद्रभान गांगुर्डे, तालुकाध्यक्ष माधव शिरसाठ, उपाध्यक्ष दीपक देवरे, प्रकाश सावंत, बापू अहिरे, आकाश सावंत, कुबेर जाधव, शशिकांत पवार, भाऊसाहेब मोरे, पोपट मोरे, केदा चव्हाण, रंजना शिरसाठ, कविता सावंत, सुपडू चव्हाण, ज्ञानेश्वर शेवाळे, तुकाराम सोनवणे, दिलीप बच्छाव, शितल सोनवणे, विलास भदाणे यांच्यासह प्रहार कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.