

पंचवटी (नाशिक): नाशिक बाजार समितीच्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे प्रशासकीय इमारत साईटवर विशिष्ट रकमेचे काम झालेले नसताना माजी सभापती देविदास पिंगळे यांनी मनमानी पध्दतीने ठेकेदाराला अधिकच्या १.४५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स दिला. विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाशिक बाजार समितीचे सभापती कल्पना चुंभळे आणि संचालक मंडळाने केला. सर्व कामांची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे चुंभळे यांनी स्पष्ट केले.
पंचवटी तसेच शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील बाजार आवारात गटारींवरील ढापे दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तरीही ठेकेदाराला ५३.६० लाख दिल्याचा दावा चुंभळे यांनी केला. व्यापारी संकुल क्र. चारचे उर्वरित काम पुर्ण करण्यासाठी ठेकेदाराला ८७.५० लाख रुपये ॲडव्हान्स देण्यात आला होता. सदर कामापोटी ठेकेदाराला प्रत्यक्षात २.७८ कोटी रुपये अदा केली. ॲडव्हान्सपैकी १७.५० लाख रुपये वसुल करणे अद्यापही बाकी आहे. समितीचे पंचवटी मार्केट यार्डमध्ये रस्ते काँक्रीटीकरणामधील खड्डे बुजविण्यासाठी २१.४६ लाख रुपये खर्च केले सले तरी कामच झालेले नाही. बाजार समितीने बाजार आवारात सुरक्षेसाठी ३५ सिक्युरिटी गार्ड नेमल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. परंतु बाजार आवारात प्रत्यक्षात २० ते २२ गार्ड कार्यरत असून प्रत्यक्षात ३५ गार्डची मासिक भत्याची रक्कम काढली जात होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पंचवटी मार्केट यार्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व सर्व्हर रुमसाठी ५५ लाख ८६ हजार खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कॅमेऱ्यांचा दर्जा बघता यातही भ्रष्टाचार झालेला आहे. त्र्यंबकेश्वर उपबाजार आवार येथे ट्रान्सफॉर्मर व गाळे विद्युतीकरणासाठी ५७.४२ लाख खर्च होऊनही प्रत्यक्षात काम अपुर्ण आहे, याकडे चुंभळे यांनी लक्ष वेधले.
सभापती पदावर विराजमान असताना शेतकरी हिताचे निर्णय घेत विकास साधला आहे. विकासकामे कायदेशीर केलेली आहेत. माझ्याशी गद्दारी केलेल्या संचालकांनी चुंभळे यांना फसवून आर्थिक फायदा करून घेतला. आता बाजार समिती विभाजन होईल आणि भविष्यात संचालक मंडळ बरखास्त होणार आहे. त्यामुळेच काही संचालक हे माझ्यावर आरोप करत कांगावा करीत आहे.
देविदास पिंगळे, माजी सभापती, बाजार समिती, नाशिक.
बाजार समिती तिजोरीत खडखडाट आहे. विकास कामांच्या नावाखाली नको त्याठिकाणी पैसे खर्च करण्यात आला आहे. सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा देखील दाखल करू.
कल्पना चुंभळे, सभापती, बाजार समिती, नाशिक.