त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीच्या पायथ्याला असलेल्या धर्मशाळेच्या प्राचीन दगडी इमारतीत १० गैरहिंदू युवकांनी नमाजपठण करत त्याचे मोबाइलवर फोटोशूट केल्याचा प्रकार साेमवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आला. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेत त्यांची चाैकशी केली. त्यात हे युवक केरळ राज्यातील मल्लापूरम जिल्ह्यातील असून, तेथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. ते पर्यटनासाठी येथे आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पायथ्याला भातखळा म्हणून ठिकाण आहे. या ठिकाणी प्राचीन दगडी इमारत धर्मशाळा म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी गावातील युवक दररोज सकाळी व्यायामासाठी जातात. सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास तेथे दहा युवक आले व सरळ धर्मशाळेच्या वरच्या मजल्यावर गेले. तेथे त्यांनी कपडे बदलले व नमाज अदा केला. नमाज अदा करताना त्यांनी त्याचे फोटाेही काढले. यावर व्यायामासाठी आलेल्या युवकांनी हरकत घेत नमाजपठण करणाऱ्या युवकांना विचारणा केली. त्यावर त्यांनी आम्ही केरळ येथून आलो आहोत. नमाजाची वेळ झाली म्हणून नमाजपठण करत होतो, असे सांगितले. त्यानंतर या प्रकाराबाबत त्र्यंबक पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत ठाण्यात आणले. तेथे त्यांचे आधारकार्ड व मोबाइलची तपासणी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथील ज्या लॉजवर ते मुक्कामाला थांबले होते त्या लॉजवरही पोलिसांनी धाव घेत त्यांच्या सामानाची तपासणी केली. मात्र, त्यात काही आक्षेपार्ह आढळले नाही. दुपारनंतर पोलिसांनी नाशिक येथून दहशतवादविरोधी पथक पाचारण केले व त्यांच्या ताब्यात युवकांना दिले असून, अधिक तपास सुरू आहे.
केरळ राज्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. त्यांची सर्व माहिती नोंदवून घेतली आहे. पर्यटनासाठी आले होते, असे निदर्शनास आले आहे.
- बिपीन शेवाळे, पोलिस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर