

नाशिक : महत्त्वाकांक्षी गोदापार्कशी संबंधित सर्व कागदपत्रे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत महापालिकेला सादर करण्यात आल्यानंतर या प्रकल्पाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
१५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या संचलनासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे खासगीकरणातून हा प्रकल्प चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून नाशिकमध्ये ५२ प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यापैकी २० प्रकल्प प्रत्यक्ष स्मार्ट सिटी कंपनीमार्फत, तर उर्वरित प्रकल्प सीएसआर निधीतून राबविण्यात आले आहेत. २० पैकी १६ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून, अद्यापही चार प्रकल्पांचे कामे अपूर्ण आहेत. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीची मुदत ३१ मार्च अखेर संपुष्टात आल्याने पूर्ण झालेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंचवटीतील रामवाडीजवळ उभारण्यात आलेल्या ६०० मीटर लांबीचा गोदापार्क स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली होती. या कामाच्या मूळ नस्ती तथा एमबी फाइल्स, कामांचे टेस्टिंग रिपोर्ट, ठेकेदाराबरोबर झालेला करार, निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती व एकूणच प्रक्रियेशी संबंधित सर्व दस्ताऐवज स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेकडे सादर केल्यानंतर या प्रकल्पाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, या प्रकल्पाच्या संचलनासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मनुष्यबळ महापालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे प्रकल्प संचलन खासगी एजन्सीमार्फत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ठेकेदार नियुक्तीकरिता उद्यान विभागामार्फत लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे.
तीन ते पाच वर्षे मुदतीसाठी हा प्रकल्प खासगी मक्तेदारास चालविण्यास दिला जाणार आहे. या प्रकल्पातील सुविधांचा वापर करण्यासाठी नागरिकांकडून नाममात्र शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. शुल्क वसुलीतून महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी गोदापार्क प्रकल्पाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाच्या संचलनासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाईल.
विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, नाशिक महापालिका.