

सिडको (नाशिक) : स्थायी तसेच अस्थायी कामगारांना वेतनवाढ, कामावरुन काढलेल्या कामगारांच्या पुर्नभरतीच्या मागणीसाठी अंबडच्या लुसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या ७० कामगारांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेले कामगार सीटू संघटनेचे सभासद असून कामावर येणाऱ्या अन्य कामगारांचा रस्ता अडवून त्यांना धमकल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
कंपनीत २९ स्थायी व २५० अस्थायी कामगार आहेत . स्थायी कामगार हे नाशिक वर्कर्स युनियन या कामगार संघटनेचे सदस्य आहेत. कंपनीने वर्क ऑर्डर कमी झाल्याने ९२ अस्थायी कामगारांना कमी केले होते. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना रुपये ८ हजार ५०० पगारवाढ दिलेली आहे. तसेच दिवाळी बोनससाठी ३६ हजार रुपयांचा प्रस्ताव दिलेला होता. युनियनचे सेक्रेटरी तुकाराम सोनजे यांनी १३ ऑक्टोबरला स्थायी कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास कामगार २७ ऑक्टोबरपासुन बेमुदत संपावर जाणार असल्याचे लेखी पत्र दिले होते.
स्थायी कामगार व कंपनीने कामावरून कमी केलेले कामगारांनी २७ ऑक्टोबरला सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत कामाला येणाऱ्या अस्थायी कामगारांचा रस्ता अडवुन जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीचे एचआर व्यवस्थापक धीरज क्षिरसागर यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसानी आंदोलनकर्ते कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून आंदोलनकर्ते तुकाराम सोनजे, संदिप पाटील, आत्माराम डावरे, देवचंद शेणे, गोकुळ मते आदींसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
कामगार परतल्याने कंपन्यांमध्ये वाढली गजबज
सिडको : अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतींमध्ये दिवाळीच्या आठ दिवसांच्या सुटीनंतर अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींमध्ये पुन्हा एकदा यंत्रांचा खडखडाट ऐकू येऊ लागला आहे.
औद्योगिक पट्टा गेल्या आठवड्याभर दिवाळीनिमित्त बंद होता. आता सुटी संपताच कारखान्यांच्या परिसरात कामगारांची वर्दळ, ट्रकची हालचाल आणि यंत्रांचा आवाज पुन्हा गतिमान झाला आहे. या दोन्ही वसाहतींमध्ये सुमारे हजारो कामगार कामावर रुजू झाले आहेत. अनेक उत्पादन प्रकल्पांनी सकाळपासूनच आपल्या युनिट्स सुरू केल्याने संपूर्ण परिसर पुन्हा उत्साही बनला आहे. काही कंपन्यांनी अद्याप अंशतः कामकाज सुरू केले असले तरी मंगळवारपासून शंभर टक्के उत्पादन पुन्हा मार्गावर येईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीत दिवाळी सुटीनंतर कारखाने सुरू झाले आहे. तसेच पोलिसांच्या गस्तीमुळे या औद्योगिक वसाहतीत चोरी झाल्याची घटना घडली नाही.
ललित बुब, अध्यक्ष
दरम्यान, कच्चा माल वाहतूक व वितरण यंत्रणाही पुन्हा सुरू झाली असून, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर वाहनांची वाहतूक गर्दी दिसून येत आहे. दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये मागणी वाढण्याची शक्यता असल्याने अनेक उद्योगांनी उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले आहे.