नाशिक : नवरात्रोत्सवादरम्यान कालिका मंदिर परिसरातील दुकानांना रात्री 11 पर्यंत परवानगी देण्यात यावी. वणी, चांदवड आदी ठिकाणी रात्री 11 पर्यंत दुकाने सुरू असतात. केवळ नाशिकमध्येच रात्री 10 पर्यंत दुकानांना परवानगी आहे. भाविक रात्री 12 पर्यंत दर्शनास येत असल्याने रात्री 11 पर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी गाळेधारकांनी केली.
कालिका देवी नवरात्रोत्सव 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्त नियोजनासंदर्भात बैठक कालिका मंदिर सभागृहात झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष केशवराव पाटील, खजिनदार सुभाष तळाजीया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे, महापालिकेचे प्रतिनिधी यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
गाळेधारकांच्या मागणीला उत्तर देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक निरुटे यांनी वरिष्ठांसमोर मागणी मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी उत्सवादरम्यान येणार्या विविध अडचणी सोडविण्याची मागणी केली. यामध्ये मंदिर परिसरातील स्वच्छता, नियमित औषधफवारणी यासह परिसरातील खड्डे बुजविण्यात यावेत. महिला बचत गटांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी चप्पलस्टॅण्ड ठेवण्यात यावेत, खासगी बसेसला मनपाच्या ओपन स्पेसमधून हटविण्यात यावे, स्पेस मोकळा करण्यात येऊन रहाटपाळण्यांना जागा देण्यात यावी. महावितरणचा 1 अभियंता किंवा कर्मचारी 10 दिवस कायम मंदिर परिसरात तैनात करावा आदी मागण्या उपस्थितांनी केल्या. मंदिर परिसरातील गाळे हे नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर लावत असतात. महापालिका रेडीरेकनरनुसार गाळेधारकांकडून भाडे आकारते. महापालिका भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देईन, अशी माहिती यावेळी महापालिका प्रतिनिधींनी दिली.
दर्शनासाठी मंदिर 23 तास खुले राहणार असून, केवळ रात्री 12 ते 1 दरम्यान बंद राहील. मंदिर परिसर 24 तास खुला राहील. रात्री 3 पासून भाविक विविध भागांतून दर्शनासाठी येतात. त्यांना प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीतून येताना सुरक्षा पुरविण्यात यावी. पोलिसांनी गस्त वाढवावी.
- केशवराव (अण्णा) पाटील, अध्यक्ष, कालिका माता मंदिर संस्थान, नाशिक
दर्शनासाठी येणार्या भाविकांना सुरक्षा पुरविण्यात येईल. मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी 200 पोलिस कर्मचारी तैनात असतील. संस्थानने कॅमेर्यांची संख्या वाढवावी.
- संतोष नरुटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे, नाशिक