

नाशिक : नाशिक विमानतळ येथे साडेपाच वर्षांपूर्वीच 'नाइट लॅण्डिंग'ची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, अद्यापही ती सुरू होऊ शकली नाही. तुलनेत शिर्डी विमानतळावर ही सुविधा सुरू आहे.
एकीकडे मुंबई, पुण्याला पर्याय म्हणून नाशिकला बघितले जात असताना, सुविधा असूनही ती वापराविना असल्याने नाशिक विमानतळाला पुढे आणण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिकनंतर उभारण्यात आलेल्या शिर्डी विमानतळाला राज्य व केंद्र शासनाकडून झुकते माप दिले जात असल्याचा उद्योजकांचा आरोप असून, त्यात तथ्य असल्याचा प्रत्यय दिवसेंदिवस येत आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळासाठी १ हजार ३६७ कोटींची तरतूद करण्यात आली. दुसरीकडे सिंहस्थ मेळा तोंडावर येऊनही नाशिक विमानतळासाठी एक रुपयाही देण्यात आला नाही. आता सोमवारी (दि. ३१) शिर्डी विमानतळावर 'नाइट लॅण्डिंग' (रात्री विमान उतरणे) सुविधेला प्रारंभ करण्यात आला. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने नाशिक विमानतळाला ही परवानगी जुलै २०१९ मध्येच दिली आहे. त्यानंतर अनेक खासगी व राजकीय नेत्यांची विमाने ओझर विमानतळावर रात्री ९ नंतर उतरली. एवढेच नव्हे, तर शिर्डी येथे 'नाइट लॅण्डिंग' सुविधा नसल्याने उशीर झालेली तेथील विमानेही नाशिकला रात्री उतरवण्यात आली. त्यात चेन्नई व बंगळुरूच्या विमानाचा समावेश होता. या विमानांतील प्रवाशांना अन्य वाहनांनी शिर्डी गाठावे लागले. मात्र, नाशिकमध्ये रात्रीची प्रवासी वाहतूक नसल्याने येथील 'नाइट लॅण्डिंग' व पार्किंग सुविधेचा प्रवासी विमानांसाठी व्यावसायिक वापर होऊ शकलेला नाही. मुंबई व पुणे विमानतळावरील ताण कमी करणे, या दोन्ही विमानतळांना सक्षम पर्याय म्हणून नाशिकला पुढे आणणे, यासाठी नाशिकमधून सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यासाठी नाशिकमधील 'नाइट लॅण्डिंग' सुविधेचा उपयोग करून घेणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ते शक्य होऊ शकलेले नाही.
मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये 'नाइट लॅण्डिंग'चे दर कमी असून, येथे एका वेळी सात विमाने उभी राहू शकतात. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, सत्ताधाऱ्यांकडून होणारा दुजाभाव, सक्षम नेतृत्वाची उणीव आदी कारणांमुळे नाशिकमध्ये 'नाइट लॅण्डिंग' सुविधा असूनही तिचा वापर होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
सन २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ मेळा होत असून, तेथील हवाई वाहतुकीसाठी शिर्डी विमानतळ हा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे विधान अहिल्यानगरच्या नेत्यांनी शिर्डीत सोमवारी केले. मात्र, खुद्द नाशिकमध्ये सुसज्ज विमानतळ असताना, कुंभमेळ्याचा केंद्रबिंदू शिर्डी विमानतळ कसे होऊ शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे.