

नाशिक : येथील ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवेत आणखी एका शहराची भर पडली आहे. बुधवार (दि. 2) पासून तमिळनाडूतील चेन्नईखोलाखाल दुसरे शहर असलेल्या कोइम्बतूरसाठी येत्या 2 एप्रिलपासून थेट विमानसेवा सुरू होत आहे. या शहरात अवघ्या चार तासांमध्ये पोहोचता येणार असून, यानिमित्त दक्षिण भारतातील पर्यटनाचा ‘हवाई मार्ग’ खुला होणार आहे.
सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनीकडून नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, इंदूर, बंगळुरू, जयपूर आदी शहरांसाठी विमानसेवा दिली जाते. त्यात 2 एप्रिलपासून कोइम्बतूरची भर पडणार आहे. कोइम्बतूर हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक शहर असून, ते ऑटोमोबाइल, फाउंड्री, कापड, दागिने, आयटी उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. देशातील महत्त्वाच्या वाहन उत्पादक कंपन्यांना लागणार्या वाहनांच्या 30 टक्के सुट्या भागांचा पुरवठा कोइम्बतूरमधून होतो. याशिवाय देशातील 50 टक्के मोटार पंप कोइम्बतूरमध्ये उत्पादित होत असल्याने, या शहराला ‘पंप सिटी’ असेही संबोधले जाते. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा ‘ऑटोमोबाइल उद्योग’ पाया असल्याने, कोइम्बतूर विमानसेवा उद्योग क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय नाशिककरांना दक्षिण भारतात हैदराबाद व बंगळुरूच्या पुढे थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘इंडिगो’ने ही विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आणखी काही शहरे नाशिकशी थेट जोडली जावीत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
नाशिक येथून दर सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी व रविवारी व्हाया गोवा ही सेवा उपलब्ध राहील.
नाशिक येथून दुपारी 3.50 वाजता निघून सायंकाळी 5.50 वाजता गोव्याला पोहोचेल.
नाशिक येथून सायंकाळी 6.15 वाजता निघून ते रात्री 8.10 वाजता कोइम्बतूर येथून सकाळी 10.40 वाजता विमान निघून ते दुपारी 12.35 वाजता गोवा येथे पोहोचेल. तेथून ते 12.55 वाजता निघून दुपारी 2.40 वाजता नाशिकला पोहोचेल. या सेवेचे बुकिंग सुरू झाले आहे.