

नाशिक : नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्स कंपनीकडून सुरू असलेल्या विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळत असून, केवळ मार्च महिन्यात तब्बल ३४ हजार ३४९ प्रवाशांनी उड्डाण केले आहे. गतवर्षी हा आकडा २२ हजार २६९ इतका होता. त्यात यंदा तब्बल ५४.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ओझर विमानतळावरून 'इंडिगो'च्या वतीने नवी दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, इंदूर, गोवा आदी ठिकाणांसाठी सेवा दिली जाते. नागपूर विमानतळाचे काम सुरू असल्याने, ही सेवा काही काळ स्थगित केली असली तरी, या सेवेला देखील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तसेच हॉपिंग फ्लाइट्सच्या माध्यमातून देशातील अनेक शहरांना नाशिक जोडले गेले आहे. ३८ आंतरराष्ट्रीय शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाइट असल्याने, सध्या नाशिकची विमानसेवा तेजीत आहे. दरम्यान, गेल्या मार्च महिन्याचा विचार केल्यास, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ५४.२ टक्क्यांची प्रवाशी वाढ झाली आहे. मार्च २०२४ मध्ये २२ हजार २६९ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर मार्च २०२५ मध्ये हा आकडा थेट ३४ हजार ३४९ वर गेला आहे. वर्षभरातील प्रवाशी संख्येचा विचार केल्यास, त्यात देखील मोठी भर पडली आहे.
२०२३-२४ मध्ये नाशिकच्या विमानतळावरून दोन लाख ४२ हजार ३७२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात २०२४-२५ मध्ये तब्बल ४०.७ टक्क्यांची वाढ होवून तीन लाख ४१ हजार ११२ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. कधीकाळी सलग तीन कंपन्यांकडून विमानसेवा बंदची घोषणा करण्यात आलेल्या नाशिक विमानतळावरून सध्या 'इंडिगो'ची सेवा नफ्यात आहे. इंडिगोकडून मोजक्याच काही शहरांना फ्लाइट उपलब्ध करून दिल्या असून, त्यास ज्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून पुढील काळात इतरही शहरांमध्ये नाशिकहून विमानसेवा सुरू केली जाऊ शकते. दरम्यान, नाशिकहून उद्योग, व्यावसायिकांसह पर्यटकांकडून विमानसेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे इतरही शहरांना जोडणारी सेवा सुरू केली जावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.
ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या कार्गो सेवेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकट्या मार्च महिन्यात ६६२ मेट्रिक टन उत्पादने कार्गोने पाठविण्यात आले आहेत. त्यात देशाअतंर्गत १३.६ मेट्रीक टन तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ६४९ मेट्रिक टन उत्पादनांचा समावेश आहे. मार्च २०२४ मध्ये १८८ मेट्रिक टन उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्गोनी पाठविण्यात आले होते.
नाशिकच्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, गतवर्षीच्या तुलनेत प्रवाशी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नाशिकसाठी ही नक्कीच सुखावणारी बाब असून, यामुळे नाशिकची विमानसेवा आणखी गतीमान होण्यास मदत होईल.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हीएशन कमिटी, निमा, नाशिक.