

नाशिक : विमाननिर्मितीतील प्रतिष्ठित कंपनी 'एअरबस' व 'एचएएल' यांच्यात डिसेंबर २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य करारानुसार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. अर्थात एचएएल येथे प्रवासी विमानांच्या देखभाल दुरुस्ती कामास प्रारंभ झाला आहे.
'स्टार एअर'ची दोन विमाने दुरुस्तीसाठी दाखल झाली असून, गेल्या आठवड्यात 'एअरबस ए-३२०' या विमानाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. विमानाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे स्थानिक उद्योजकांना फायदा होणार असून, यातून अर्थकारणाला गती मिळणार आहे.
यापूर्वी देशभरातील सर्व नागरी विमानांची देखभाल-दुरुस्ती सिंगापूरला केली जात होती. मात्र, केंद्र सरकारने या सेवेचे स्वदेशीकरण करण्याबाबत जाहीर केल्यानंतर, नाशिकच्या ओझर येथील 'एचएएल' कंपनीत हे काम व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींसह निमा, आयमा या औद्योगिक संघटनांच्या वतीने पाठपुरावा केला गेला. त्यातून लढाऊ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे केंद्र 'एचएएल'मध्ये करण्यात आले. त्यात खासगी हेलिकॉप्टर व लहान विमानांची दुरुस्ती केली जाऊ लागली. दरम्यान, प्रवासी विमानांच्याही देखभाल दुरुस्तीचे कामे एचएएलमध्ये व्हावेत याबाबतची मागणी केली गेल्यानंतर २०२३ मध्ये एअरबस आणि एचएएल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. करारानुसार 'एअरबस'च्या ए-३२० कुटुंबातील सर्व विमानांची देखभाल दुरुस्ती ओझरच्या एचएएलमध्ये करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी 'एअरबस'कडून 'एचएएल'ला तांत्रिक प्रशिक्षण, विशेष सल्लागार सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. तेव्हापासून वर्षभरात या प्रक्रियेला प्रारंभ होणार होता. मात्र, सुमारे तीन महिने विलंबाने ही सेवा सुरू झाली आहे.
एचएएलमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात एअरबसचे ए-३२० विमान दाखल झाले होते. या विमानाची अवघ्या दोन आठवड्यात देखभाल-दुरुस्ती करून गेल्या आठवड्यात ते रवाना करण्यात आले. त्यानंतर स्टार एअरची दोन विमाने देखभाल दुरुस्तीसाठी एचएएलमध्ये दाखल झाली आहेत. प्रत्येक विमानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी वेगवेगळा असल्याने, या विमानांची दुरुस्ती कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मात्र, एचएएलमध्ये विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने, नाशिक देशाचे केंद्रबिंदू बनले आहे.
देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे नाशिकच्या उद्योगांना याचा मोठा फायदा होणार असून, भविष्यात नाशिकमधील व्हेंडरना सुट्या भागांच्या उत्पादनांची कामे मिळू शकतात. नाशिकमध्ये देशभरातील अधिकाऱ्यांचे येणे-जाणेही वाढणार आहे.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हीएशन कमिटी, निमा, नाशिक.