

नाशिक : नाशिक मनपा कार्यक्षेत्रात अत्याधुनिक कृषिमाल विक्री केंद्र व शीतगृह उभारण्यात येईल. यासाठी तातडीने नाशिक मनपा आयुक्तांकडून प्रस्ताव मागवण्यात येऊन लवकरच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, अशी माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उद्योगमंत्री उदय सामंत व पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
विधान परिषद पावसाळी अधिवेशनादरम्यान नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील बळीराजाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या असलेल्या अत्याधुनिक कृषिमाल विक्री केंद्र उभारणीसंदर्भात विधान परिषदेचे आमदार भुजबळ यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीत आमदार भुजबळ म्हणाले की, नाशिक मनपा हद्दीत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळबागांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, स्थानिक पातळीवर अत्याधुनिक कृषिमाल विक्री केंद्र उपलब्ध नसल्याने येथील शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुंबईसह इतर दूरच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी न्यावा लागत आहे. यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांना अनावश्यक आर्थिक फटका बसत आहे. कार्यक्षेत्रात पुरेशी शीतगृह सुविधा नसल्याने नाशवंत कृषिमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तिन्हींना एकाच छताखाली हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाशिकमध्ये अत्याधुनिक शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी - व्यापारी ग्राहक मार्केट उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या दिरंगाईकडे आमदार भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. या प्रकरणी तातडीने विशेष निधी मंजूर करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. यावर उद्योगमंत्री सामंत आणि पणनमंत्री रावल यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन सदर प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
शीतगृहासाठी मनपाकडून जागा देणार : सामंत
नाशिक मनपा हद्दीत शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळभाज्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शीतगृह उभारणीसाठी आवश्यक जागा मनपाकडून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या भाजीपाला साठवणुकीच्या समस्येबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. मनपाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध निधी आणि आवश्यक तरतुदींचा विचार करून सर्व संबंधित विषय सर्वसाधारण सभेपुढे मांडले जातील. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली शीतगृह सुविधा तसेच भाजीपाल्याचा नाश होऊ नये यासाठी आवश्यक संपूर्ण प्रक्रिया उभी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासंदर्भात संबंधित सर्व घटकांची बैठक आयोजित करून आवश्यक निर्णय घेण्यात येणार आहेत.