

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
तपोवन परिसरातील केवडीबन येथे सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा छडा अवघ्या तीन दिवसांत लावत आडगाव पोलिसांनी मुख्य आरोपीला कर्नाटकातील मेंगलोर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात मृत महिलेची ओळख सुनीता विश्वकर्मा (३५, रा. आम्रपाली वसाहत, कॅनॉल रोड, उपनगर) अशी पटली असून, तिचा खून संशयित प्रियकर गोपीनाथ उर्फ दिनात गोसावी (४०) याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सुनीता विश्वकर्मा या घरकाम व भांडी धुण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होत्या. त्या गोपीनाथ गोसावीसोबत राहात होत्या. शनिवारी (दि. १३) दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
संतापाच्या भरात गोपीनाथने सुनीता यांना बेदम मारहाण केली होती. त्यात त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. घटना उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने सुनीता यांचा मृतदेह गोणीत भरून सुटकेसमध्ये कोंबला. त्यानंतर स्कूटीवरून मृतदेह नेऊन तपोवन येथील केवडीबन परिसरातील कृषी गो-सेवा ट्रस्टजवळ टाकला. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या क्रूर हत्येमागील नेमके कारण, आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाची मदत घेतली का तसेच खून पूर्वनियोजित होता की, संतापाच्या भरात घडला, याचा तपास आडगाव पोलिसांकडून सुरू आहे. मंगळवारी (दि. १६) ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तपोवन परिसरात तीव्र दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी पाहणी केली असता, संशयास्पद सुटकेस आढळली.
पोलिसांना माहिती देताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख आणि आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविणे मोठे आव्हान होते. मात्र श्वानपथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ, गुन्हे शाखा आणि आडगाव पोलिसांनी बेपत्ता महिलांच्या नोंदी, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.
असा झाला उलगडा
शनिवारी (दि. १३) महिलेचा खून संशयित गोपीनाथ गोसावीने केला. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. माझ्याकडून सुनीताचा खून झाला आहे, अशी माहिती त्याने आपल्या वहिनीला दिली. मात्र अति दारूच्या आहारी गेल्यामुळे तो नेहमीच अशी बडबड करत असतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मात्र जेव्हा सोशल मीडियावर महिलेचा मृतदेह हा तपोवन परिसरात सापडला आहे, असे समजताच आरोपीच्या वहिनीने हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला आडगाव पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले.