

नाशिक : धरणांची साठवण क्षमता वाढविण्यासोबतच शेतजमिनीची सुपिकता सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' अभियानाची तालुका स्तरावर प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी दिल्या.
धरणांमधील गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देऊन शेतीची सुपिकता वाढविणे हे 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी रा.ही. झुरावत, लघु पाटबंधारे विभागाचे ओमकार पाचपिड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, तंत्र अधिकारी विजय चौधरी, वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे यांच्यासह सर्व तालुका जलसंधारण अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाल्या की, अत्यल्प व अल्पभूधारक, विधवा, अपंग तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धरणांमधून काढलेला सुपिक गाळ मोफत देण्यात येतो. धरणालगतच्या शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिल्यास गाळाचा अधिक वापर होऊन धरणाची साठवण क्षमता वाढेल. खोदकाम व गाळवाटपाचा दररोज ताळेबंद ठेवावा तसेच काम पूर्ण झाल्यावर ग्रामसभेची मान्यता घेऊन अंतिम अहवाल सादर करावा, असेही त्यांनी निर्देश दिले.
जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील मागील दोन वर्षांतील कामांची स्थिती, प्रस्तावित व प्रगतीपथावरील कामांचे अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच सामाजिक दायित्व निधी मिळविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, निमा, आयमा, एमआयडीसी यांच्या संयुक्त बैठका घेण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत जलयुक्त शिवार अभियान 2.0, मृद व जलसंधारण विभागाची पडताळणी, जलशक्ती अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व पाणलोट विकास घटक 2.0 या योजनांचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा अधिकारी झुरावत यांनी विविध योजनांची माहिती बैठकीत सादर केली.