नाशिक : दरपत्रक न लावणाऱ्या रुग्णालयांवरील कारवाई कागदावरच

केवळ नोटिसांचा सोपस्कार; ठोस कारवाई नाहीच
रुग्ण हक्क सनद व दरपत्रक
रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारकpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात न लावणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केवळ नोटिसांचे सोपस्कार पार पाडले. संबंधित रुग्णालयांविरोधात ठोस कारवाई न झाल्याने पालिकेच्या नोटीसींना केराची टोपली दाखविली गेली. अनेक रुग्णालयांमध्ये अद्यापही रुग्ण हक्क सदन व दरपत्रक दर्शनीभागात लावण्यात आलेले नसून रुग्णांच्या आर्थिक लूटीच्या तक्रारी कायम असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कधी जाग येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून होणारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट रोखण्यासाठी तत्कालिन सरकारने रुग्णसेवेचे दर निश्चित करत दरपत्रक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश रुग्णालयांना दिले होते. या नियमांची बहुतांश रुग्णालयांनी अंमलबजावणी केली. मात्र कोरोना सरताच रुग्ण हक्क सनद व दरपत्रकाचा रुग्णालयांना विसर पडला. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सर्वच ६५० नोंदणीकृत रुग्णालयांना सूचनापत्र देत दरपत्रक व रुग्णहक्क सनद दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही आदेशांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अखेर रुग्णालयांची तपासणी करण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला. पहिल्या टप्प्यात शहरातील २० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यात अनेक गंभीर बाबी आढळून आल्या होत्या. यात रुग्णहक्क सदन व दरपत्रक दर्शनी भागात न लावणाऱ्या तीन रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

दुसऱ्या टप्प्यात शहरातील सिडको भागातील रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यात पाच खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही तपासणी मोहिम थंड बस्त्यात गेली. रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात न लावणाऱ्या रुग्णालयांवर ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांचे फावले असून, अनेक रुग्णालयांमध्ये अद्यापही रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावले गेले नसल्याच्या तक्रारी आहेत.

महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट नुसार सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्क सनद व रुग्णसेवा दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित रुग्णालयाविरोधात १८००२३३४२४९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.

डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news