

नगरसूल (नाशिक) : राहता तालुक्यातील साकुरी येथून दशक्रिया विधी आटोपून नगरसूलकडे परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला कोपरगाव येथील येवला नाक्यावर वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पती जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसूल येथील महाले वस्तीवरील डॉ. रामकृष्ण माधव महाले आणि त्यांची पत्नी संगीता महाले हे दोघे साकुरी येथून घरी परतत होते. कोपरगाव येथील येवला नाक्यावर त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर पडले असता, मागून आलेल्या कंटेनरच्या चाकाखाली संगीता महाले सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती डॉ. रामकृष्ण महाले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी संबंधित कंटेनर ताब्यात घेतला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.