

नाशिक : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे.
पहिली घटना आरटीओ कॉर्नर सिग्नल येथे गुरुवारी (दि. १) सकाळी १२ च्या सुमारास घडली. हितेश संजय सोनवणे (३०, रा. दिंडोरी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते बहीण जयश्री (२३) समवेत दुचाकीवरून (एमएच १५, सीई ०९७३) शालिमार येथे जात होते. सिग्नल लाल असल्याने ते थांबलेले असताना, पाठीमागून संशयित अनिल मच्छिंद्र साळवे (३२, रा.दिंडोरी रोड) याने आणलेल्या भरधाव पिकअप (एमएच १५, एचएच ७३०३)ने धडक दिली. त्यात जयश्रीचा मृत्यू झाला. तर इतर वाहनचालकांना दुखापती झाल्या. वाहनांचेही नुकसान झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी घटना पाथर्डी शिवारात बुधवारी (दि.३०) रात्री ११ च्या सुमारास घडली. विजय धोंडीराम सूर्यवंशी (३३, रा. सदाशिवनगर, पाथर्डी शिवार) हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी कारचालकाने (एमएच १५, एचसी ३६४०) विक्रम यांच्या दुचाकीस समोरून धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.