

चांदवड (नाशिक) : तेराव्याचा कार्यक्रम आटोपून घरी जाण्यासाठी येथील पेट्रोलपंप चौफुलीजवळ मुंबई-आग्रा महामार्ग पायी ओलांडत असलेल्या तीन महिलांना भरधाव ट्रकने उडविल्याची घटना गुरुवारी (दि.26) रोजी दुपारी घडली. या अपघातात मालेगाव येथील महिलेचा मृत्यू झाला, तर दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विनोद पहाडे (६२), रमेश पहाडे (७४), सुशीला पहाडे (६०), अनिता पहाडे (५५) व गुणमाला श्रीपाल पहाडे (६८, सर्व रा. मालेगाव) गुरुवारी (दि. २६) लासलगाव येथील तेराव्याच्या कार्यक्रमास आटोपून दुपारी अडीचच्या सुमारास बसने चांदवडला आले होते. बसस्थानकात उतरल्यावर मालेगावला जाण्यासाठी सर्व जण येथील पेट्रोलपंप चौफुलीवर बस पकडण्यासाठी पायी जात होते.
पायी जात असताना याचवेळी मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडत असताना मनमाडकडून मालेगावकडे वळण घेत असलेल्या ट्रकने सुशीला पहाडे, अनिता पहाडे व गुणमाला पहाडे यांना समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गुणमाला पहाडे यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशीला पहाडे यांच्या पायावरून चाक गेले, तर अनिता पहाडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातग्रस्तांना चांदवड बाजार समिती संचालक वाल्मीक वानखेडे, पोलिस निरीक्षक कैलास वाघ, डॉ. सतीश गांगुर्डे, डॉ. भालचंद्र पवार यांनी मदतकार्य करत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची चौकशी केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार स्वप्नील जाधव करीत आहेत.