Nashik Accident News | टेहरे बायपासवर कारचा भीषण अपघात; डॉक्टर ठार

संशयास्पद पंचनाम्यावरुन शिक्षणमंत्र्यांकडून पोलिसाच्या निलंबनाची मागणी
मालेगाव (नाशिक)
टेहरे बायपासवर कारचा भीषण अपघातPudhari News Network
Published on
Updated on

मालेगाव (नाशिक) : मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे गावाच्या बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात 22 वर्षीय पशुवैद्य डॉक्टर ठार झाला. या अपघातानंतर पोलिस प्रशासनाने आरोपींच्या बचावाची भूमिका घेतल्याचा आरोप शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केल्यामुळे या घटनेस राजकीय वळण प्राप्त झाले आहे, तर दुसरीकडे अपघाताच्या ठिकाणी आरोपींना घेण्यासाठी आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कोणाची ? याबद्दलची उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये रंगली.

बुधवारी (दि. 11) रात्री 10.15 च्या सुमारास टेहरे गावाच्या बायपासकडून सोयगावकडे कार (एमएच 02, सीएल 8316) भरधाव जात होती. त्यावरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्याने मालेगावकडून टेहेरे व मुंगसेकडे जात असलेल्या दुचाकी (एमएच 41, एके 3071) ला तसेच दुसर्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मुंगसे येथील पशुवैद्य डॉक्टर शेखर अहिरे यांना वाहनाने फरपटत नेल्यामुळे ते वाहनाखाली दबून जागीच ठार झाले, तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ही कार पुढे जाऊन विजेच्या खांबावर जाऊन आदळली. त्यामुळे तो खांब पडल्यामुळे विजेच्या तारा लोंबकळत रस्त्यावर पडल्या होत्या. अपघाताचा आवाज येताच ग्रामस्थांनी अपघातास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. दुचाकी, विजेच्या तारा बाजूला करत अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविण्यात आले असून, जखमींवर मालेगाव व नाशिक येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मालेगाव (नाशिक)
मालेगाव : छावणी पोलीस ठाण्यात अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसंधू यांच्याशी चर्चा करताना दादा भुसे व ग्रामस्थ.Pudhari News Network

अपघाताबाबत पोलिसांच्या भूमिकेविषयी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी बोलणे झाले आहे. आपण मुख्यमंत्री यांच्या कानावर ही घटना टाकणार आहोत. या अपघातातील दोषी कोणीही असू द्या. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

दादा भुसे, शिक्षणमंत्री

दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धाव घेतलेल्या ग्रामस्थांना कारमधील तीन ते चार लोकांनी तुम्ही आम्हाला ओळखले का? आम्ही कोणाची माणसे आहोत तुम्हाला माहिती आहे का ? अशी दमदाटी केली. तर काहींच्या हातांना चावा घेतला. यावेळी छावणी पोलिसांनीदेखील अपघात केलेल्या कारमधील लोकांना मदत केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी शिक्षणमंत्री भुसे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना बरोबर घेत छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

मालेगाव (नाशिक)
मयत डॉ. शेखर अहिरेPudhari News Network

दरम्यान, मालेगाव शहर व परिसरात गेल्या काही आठवड्यांत वाढलेले अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. विविध घटनांमध्ये आठ तरुणांनी आपला जीव गमावला आहे. पोलिस प्रशासनाने महामार्गावर वाहने तपासणी व दंडात्मक कारवाई सुरू केली असली, तरी अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. वेगावर नियंत्रण राहण्यासाठी रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही, सिग्नल व्यवस्था आणि पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

‘ती’ स्कॉर्पिओ कोणाची ?

अपघातानंतर काही वेळातच अपघातस्थळी एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. त्यात अपघातग्रस्त वाहनातील चौघे बसून निघून गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली होती. तर अपघातास कारणीभूत ठरलेला वाहनचालक उपचारासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयातदेखील दाखल झाला होता. त्यानंतर तो फरार झाल्यामुळे पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या भूमिकेवरदेखील संशय निर्माण झाला. या घटनाक्रमाचा संदर्भ देत मंत्री भुसे यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.

Nashik Latest News

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news