

पंचवटी (नाशिक) : दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी विद्यार्थिनीचे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. अनुष्का शांताराम निमसे असे विद्यार्थिनीची नाव असून, तिने नुकतेच दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते.
शांताराम निमसे (वय ४३, रा. नांदूर, कमळ वाडी, संभाजी नगर रोड) हे आपल्या दुचाकीवरून मुलगी अनुष्का सोबत गुरुवारी (दि.२२) रोजी सायंकाळी कोणार्क नगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेले होते. घरी परत येत असताना जत्रा चौक - नांदुरू नाका लिंक रोडवर मागून आलेल्या कारने धडक मारली होती. धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन थांबले नाही, या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे. या धडकेत शांताराम निमसे व अनुष्का हे दोघेजण दुचाकीवरून खाली पडले. शांताराम निमसे यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला व डोक्यास मार लागुन दुखापत झाली. तसेच मुलगी अनुष्काच्या डोक्यास, हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली होती. दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अनुष्काचा रविवारी (दि.२५) मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी तिच्यावर नांदूर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.