

नाशिक : गौरव अहिरे
राज्यात दरवर्षी ३२ हजारांहून अधिक अपघात होत असून, त्यात सरासरी १५ हजार नागरिकांचा मृत्यू, तर २८ हजार ५०० नागरिक जखमी होत आहेत. राज्य शासनाच्या अहवालानुसार मागील वर्षी दर 10 हजार वाहनांमागे सात अपघातांची नोंद झाली आहे. २०१५ मध्ये हे प्रमाण तब्बल २५ इतके होते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यात यश येत आहे.
राज्यात दरवर्षी सरासरी २२ लाख नवीन वाहनांची नोंद होत असते. तसेच डिसेंबर २०२४ पर्यंत राज्यात वाहन चालवण्याचा वैध परवाना संख्या ४ कोटी २८ इतकी होती, तर सुमारे २६ लाख शिकाऊ परवाना वितरीत करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरात कोट्यवधी वाहने दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होतात. सर्वाधिक अपघात वाहनांच्या वेगामुळे झाल्याचे समोर आले आहेत. अतिवेगामुळे अपघात होऊन सर्वाधिक मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच रस्ते सुरक्षा या संकल्पनेवर आधारित पथनाट्ये व व्याख्याने आयोजित केली जातात. त्यामुळे अपघातांची संख्या घटण्यास मदत होत असल्याचे बोलले जात आहे. २०१५ साली राज्यात दर 10 हजार वाहनांमध्ये २५ अपघात होत असत, आता हे प्रमाण ७ पर्यंत आले आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी राज्यात सुमारे ६ हजार ३०० ई- चलान उपकरणे वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहेत. तसेच ९६ इंटरसेप्टर वाहनेही महामार्गांवर कार्यरत आहेत. मागील वर्षी १ कोटी ६९ लाख बेशिस्त चालकांना १ हजार ५३३ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला. त्यापैकी सुमारे ४० लाख चालकांनी दंड भरला आहे, तर १ कोटी २७ लाख १५ हजार चालकांकडील सुमारे १ हजार २३४ कोटी रुपयांची दंडवसुली अद्याप बाकी आहे.