

चांदवड/ मालेगाव (नाशिक) : हजहून येणाऱ्या तरुणीला घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघात मालेगाव येथील अकरावर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. १४) सकाळी १० च्या सुमारास चांदवडजवळील मंगरूळ टोल नाक्याजवळ ही घटना घडली.
मालेगाव येथील फतेह मैदान भागातील नऊजण हजहून येणाऱ्या हाकसा मोहम्मद यासीन (२५) हिला मुंबईहून आणण्यासाठी कार (एमएच ४६, एन ६२४४) ने मुंबईकडे निघाले होते. चांदवडजवळील मंगरूळ टोल नाक्याजवळ चालक अबुजर मोहम्मद याकुब (३२) यांचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच ०४, केयू ८७७४) जोरदार धडकली. यात उमैमा फिरदोस मोहम्मद यासीन हिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर सबिना साजिद अख्तर (५४), तुबा मुज्जमील हुसेन (३२), अबुजैद मोहम्मद याकुब (३५), मुज्जमील हुसेन मोहम्मद शाबीर (३०), जीआवर रहमान मोहम्मद यासीन (२०), अल्ताफ रहमान मोहम्मद यासीन (२३), कुरेशा मोहम्मद शाबीर (७०) व आमना मोहम्मद यासीन (४६) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ चांदवडच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस कर्मचारी विक्रम बस्ते, शिवा शेळके व सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हवालदार अनिल शिरसाठ व कॉन्स्टेबल प्रदीपसिंग राजपूत अधिक तपास करीत आहेत.