

नाशिक : भरधाव कार चालवत पादचारी दाम्पत्यास धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रथचक्र चौक येथे सोमवारी (दि. 2) घडली होती. यातील गंभीर जखमी झालेल्या दीपक चिंतामण पाठक (रा. राजसारथी सोसायटी) यांचा उपचारादरम्यान शनिवारी (दि. 7) मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक पाठक हे पत्नी नीता पाठक यांच्यासह सोमवारी (दि. 2) रात्री पायी जात होते. त्यावेळी एमएच 15 जेएक्स 0275 क्रमांकाची कार भरधाव चालवत चालकाने पाठक दाम्पत्यांस धडक दिली. या धडकेत नीता बाजूला फेकल्या गेल्या, तर दीपक हे काही मीटर फरफटत गेले. त्यात दीपक हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघाताची ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली होती. अपघातानंतर कारचालकाने पळ काढला होता. मेंदूला गंभीर इजा झाल्याने दीपक यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शनिवारी (दि. 7) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. चालकास अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
लेखानगरकडून पाथर्डी फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या आकाश चिंधा निकम (35, रा. विनयनगर) यांना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.