Nashik Accident | नाशिकमध्ये पुन्हा हिट अॅण्ड रन; टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

शहरातील विविध घटनांमध्ये पोलिसात गुन्हे दाखल
Nashik Accident
नाशिकमध्ये पुन्हा हिट हिट अॅण्ड रन; टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यूfile photo

नाशिक : राज्यात हिट अॅण्ड रनच्या घटना सातत्याने समोर येत असताना, नाशिकमध्ये देखील अशाचप्रकारच्या घटनेमध्ये महिलेला जीव गमवावा लागला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत तरुण गंंभीर जखमी झाला आहे. निव्वळ वाहन चालकाच्या बेदरकारपणामुळे या घटना घडल्याचे पोलिसात नोंदविण्यात आले आहे.

पहिली घटना गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पादचारी महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने, महिलेचा मृत्यू झाला आहे. फिर्यादीनुसार, मृत महिलेचा भाचा पवन रवींद्र दीक्षित (३५, रा. काळाराम मंदिरामागे, दीक्षित वाडा, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आत्या निधी नीलेश वारे (४९, रा. गिरीराज अपार्टमेंट, मॅक्डॉनल्ड मागे, कॉलेजरोड) या सोमवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी क्रोमा शोरूम ते डॉन बास्को स्कुल या रस्त्याने पायी जात होत्या. अशात भरधाव आलेल्या टेम्पो चालकाने (एमएच १५, एचएच २७२५) हयगयीने त्यांना जोरात धडक दिली. त्यात डोक्यास गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. गंगापूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या घटनेत, चेतन संजय चव्हाण (३१, रा. नामपूर, जयशंकर रोड, सटाणा) हे मित्र मयूर दिगंबर नंदन (२७, ताहाराबाद, ता. बागलाण) यांच्यासोबत दुचाकीवरून विसे मळा, महाराजा दरबार समोरील चौफलीवरून कॅनडा कॉर्नरच्या बाजूने येत असताना कार (एमएच १५ एचवाय २१९०) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे चेतनला गंभीर मार लागला. त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले असून, उजवा पाय व डाव्या डोळ्याजवळ मार लागला आहे. तसेच नंदन यांच्या देखील डाव्या पायास जबर दुखापत झाली आहे. तसेच डोक्यालाही मार लागला आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कारचालकांच्या बेदकारपणामुळेच दोन्ही घटना घडल्याचे पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

तरुणीला धडक

चुकीच्या दिशेने येत तरुणीला धडक देऊन दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या २५ वर्षीय तरुणावर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या सोमवारी (दि.८) ही घटना घडली. तरुणी दहीपुलाजवळील जय चौकातून जात असताना महेश दौलत भुरिया (२५, संदेश अपार्टमेंट, जगताप मळा, देवळाली गाव) याने चुकीच्या दिशेने येत तरुणीच्या दुचाकीला धडक दिली. तसेच शिवीगाळ करीत सार्वजनिक ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल, अशी वर्तणूक केली. तरुणीच्या चेहऱ्यावर मारहाणदेखील केली. दमबाजी करीत, जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news