

सिडको : मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुली जवळ गेल्या रविवारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेला राहुल साबळे ( वय १७ ) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली आहे . घरातील एकुलता असलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सह्याद्री नगर भागातील एका नागरिकांच्या धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना रविवारी भाविकांच्या टेम्पोला अपघात होऊन ८ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेला राहुल साबळे ( वय १७, रा. सहयाद्रीनगर , सिडको ) याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान मृत्यूशी झुंज देत असताना शुक्रवारी (दि.१७) रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातात यापूर्वी पिता-पुत्रासह सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. मृत राहुल हा इयत्ता १२ वी मध्ये शिकत होता.राहुल चे वडील बिगारीचे काम करतात तर आई लोकांची धुणे-भांडी करते. घरातील एकुलता असलेल्या तरूण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोगर कोसळला आहे.