

सिडको : द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (दि. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातात दगावलेल्या सहापैकी पाच जणांवर मोरवाडी स्मशानभूमीत, तर अन्य एकावर मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथे साेमवारी (दि. १३) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झालेत. सिंहस्थनगर (सिडको) येथील पिता-पुत्र, दोन सख्खे भाऊ आणि अन्य एकाला अग्निडाग दिला गेला तेव्हा आप्तांनी फोडलेल्या टाहोने मोरवाडीकर स्तब्ध झाले हाेते. दरम्यान, कृषीमंत्री माणिक कोकाटे यांनी सिंहस्थनगरला भेट देऊन मृत्युमुखी पडलेल्या कुटूबांचे सांत्वन केले.
लोखंडी सळया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मागून टेम्पो आदळून हा अपघात झाला होता. धडक एवढी जोरदार होती की, ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि टेम्पोच्या मागे बसलेल्या तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने एक जण थोडक्यात बचावला. सह्याद्रीनगर भागातील रहिवाशी या टेम्पोमध्ये होते. हे सर्व निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण हा कार्यक्रम आटोपून परतत होते. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दोन टेम्पो केले होते. महिलांचा टेम्पो सिंहस्थनगरमध्ये सुरक्षित पोहोचला, मात्र दुसऱ्या टेम्पोतील भाविकांवर काळाने घाला घातला. दर्शन घरटे (१८), त्याचा भाऊ ओम घरटे (१६), यश खरात (१७), चेतन पवार (१७, वडनेर खाकुर्डी), संतोष मंडलिक (५६) आणि त्यांचा मुलगा अतुल (२२) असे सहा जण एका घटनेत हिरावले गेले. ही वार्ता धडकताच सिंहस्थनगरमध्ये आप्तांवर दुखाचा डाेंगर कोसळला. त्यांच्या दु:ख विलापाने परिसर सुन्न झाला होता. घरटे बंधू, खरात आणि मंडलिक पितापुत्रावर मोरवाडी स्मशानभूमीत सोमवारी शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार झाले. तर चेतन पवार याचा वडनेर खाकुर्डीत अंत्यविधी पार पडला.
घरटे बंधू आईसमवेत आईसमवेत राहत हाेते. ते लहान असतानाच वडिलांचे अपघाती निधन झाले होते. आई पेठ रोडवरील ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करित कुटुंबाचा उदरनिर्वाह करित होत्या. दर्शन हा बारावीत, तर ओम अकरावीत शिकत होता. त्यांच्या अपघाताचे वृत्त एेकताच आई भोवळ येऊन कोसळली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला मात्र, घटनेचा त्यांच्या मनावरील आघात इतरांनाही हेलावून जात होता.
या अपघातात संतोष मंडलिक व त्यांचा मुलगा अतुल ठार झालेत. संतोष हे कामगार होते, तर अतुल हा जिम ट्रेनर तसेच डिलेव्हरीचे काम करत कुटुंबाला हातभार लावत होता. घरातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंब पोरके झाले. घरात अतुलची आई व लहान भाऊ आहे.
यश खरात हा वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याची आई मोलमजुरी, तर वडील शिर्डी येथे रिक्षा चालवतात. दोन लहान बहिणी आहेत. यश एकुलता मुलगा हाेता.
चेतन पवार हा दहावीमध्ये शिकत होता. अभ्यासात हुशार होता. त्याचे अभियंता होण्याचे स्वप्न होते. वडिल औद्योगिक वसाहतीतील कंपनीत सुरक्षारक्षक असून, आई धुणीभांडी करते. लहान भाऊ शिकत आहे. या सर्वांची आशा असलेल्या चेतनची अकाली एक्झिट परिसरातील नागरिकांनाही चटका लावून गेली.
याच टेम्पोमध्ये सिंहस्थनगर येथील विक्रांत ठाकूर हा युवक होता. परंतू, टेम्पो चालक वेगाने चालवत असल्याने त्याने प्रवास अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला. तो रस्त्यात खाली उतरला आणि काही क्षणातच या टेम्पोचा हा भीषण अपघात झाला. त्याला सतावत असलेली भीती खरी ठरली, मात्र इतरांना काळाची पाऊले ओळखता आली नाहीत.
मंत्री गिरीश महाजन, आ. सीमा हिरे व भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी या अपघातातील जखमीवर उपचार सुरू असलेल्या उत्तमनगर कल्पतरू हॉस्पिटलला भेट दिली. रुग्णांची त्यांनी चौकशी केली. डॉ. वैभव महाले यांच्याकडून उपचाराबाबत माहिती घेतली. यानंतर लेखानगर येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल जखमींची ही विचारपूस केली. यावेळी संचालक डॉ. उमेश मराठे उपस्थित होते.
तीन वर्षांपूर्वी कारणाच्या कार्यक्रमप्रसंगी कुत्र्याने बोकडाचे शिर पळवून नेले नसते तर ही घटना घडली नसती, अशी चर्चा एेकायला मिळाली. सिडको परिसरातील गंभीरे यांच्या परिवाराने तीन वर्षांपूर्वी धारणगाव (वीर) येथे पारंपरिक श्रद्धेने कारणाचा कार्यक्रम आयोजिला होता. मात्र, कार्यक्रम सुरू असतानाच बोकडाचे शीर भटक्या कुत्र्याने पळवून नेल्याची अनपेक्षित घटना घडल्याने कार्यक्रम अपूर्ण राहिला होता. त्याचे अनेकांच्या मनात शल्य होते. ज्यामुळे रविवारी हा कार्यक्रम पुन्हा घेत तो तडीस नेला गेला. कार्यक्रमादरम्यान, जुनी आठवण जागी झाल्याने काही जण भावुक झाले. ''त्या वेळी जर कार्यक्रम पूर्ण झाला असता, तर अनेक गोष्टी टळल्या असत्या," अशी चर्चा नागरिकांमध्ये होती .