देवळाली कॅम्प : भगूर नगर परिषदेच्या वतीने पाइपलाइन दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा काम झाल्यानंतर तसाच सोडून दिल्याने त्यात पडून दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याप्रकरणी भगूर नगर परिषद प्रशासनाने या कामात कुचराई करणार्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी रवींद्र संसारे यांना निलंबित केले आहे. (Nashik Road Accident: Pothole Claims Life of Young Biker In Bhagur)
भगूर गावातील वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्सजवळ जलावाहिनी दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तो तसाच सोडून निघून गेले. खोदलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी कोणताही सूचना फलक त्यांनी लावलेला नव्हता. त्यामुळे अमित गाढवे या दुचाकीस्वाराचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. परिणामी संतप्त रहिवाशांनी तसेच गाढवे यांच्या परिवाराने आर्थिक भरपाईची मागणी करताना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या होत्या. मृत गाढवे यांच्या पत्नी याना शासकीय नियमानुसार कामावर घेण्याबाबत लेखी स्वरूपात नगरपालिका प्रशासनाने कळविले आहे. तर खोदलेला खड्डा व इतर कामकाजाची माहिती घेत प्रथमदर्शनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या व कामात कुचराई करणाऱ्या रवींद्र संसारे या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले.
भगूर नगरपालिका हद्दीत पालिका प्रशासनाच्या वतीने कामकाजाच्या सोयीसाठी खोदण्यात आलेले सर्व खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात येतील. शिवाय शहरात इतरही ठिकाणी काही धोकादायक खड्डे असतील, तर त्याचीही पाहणी करून ते बुजवण्याचे काम केले जाईल. तसे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी दिली.