स्वागत, उत्साह, आनंद अन् चैतन्याची उत्तुंग गुढी

घरोघरी गुढी उभारुन करण्यात आले हिंदू नववर्षाचे स्वागत
नाशिक
नाशिक : सण-उत्सवाच्या परंपरा जोपासणारी सांस्कृतिक -धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदानगरीत घरोघरी गुढी उभारुन मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जूने नाशिकमधील सोमवार पेठेतील वाड्यात पारंपरिक मंगल पोषाखात गुढी पूजन करताना मराठी जोडपे.( छाया : रुद्र फोटो)
Published on
Updated on

नाशिक : शहरातील विविध भागातून निघालेल्या संस्कृती अन‌् परंपरांचा साज ल्यायलेल्या चैतन्यमयी स्वागत यात्रा, भव्य, सुबक, कलात्मक रांगोळ्या आणि भक्तीरसात भिजलेले मैफलीतील आध्यात्मानुभूती देणारे सुस्वर मैफल. अशा मंगलमयी, प्रसन्न आणि पावन वातावरणात शहर व परिसरात हिंदू नववर्षारंभ गुढीपाडवा सण पारंपरिक हर्षोल्हासात साजरा झाला. ३० हून अधिक शोभायात्रामध्ये विविध पथकांतील निनाद अ‌न् चित्ररथ लक्षवेधी ठरले.

हिंदू नववर्ष दिन गुढीपाडव्याच्या औचित्यावर रविवारी (दि. ३०) शहर व परिसरातून सकाळी साडेसहापासून विविध ३० संस्थांतर्फे चित्ररथांसह शोभायात्रा काढण्यात आल्या. ढोल, लेझीम, शंखनाद, झांज आदी पथकांचे लयबद्ध संचलन आणि भगव्या ध्वजांसह पारंपरिक पोषाखात बांधवांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. काटदार फेटे, नाकात नथनी, नववारी साडी अशा मराठमोळ्या पोषाखातील महिलांचा सहभाग, चित्ररथ, अश्व, बैलगाडी यांचे वैभवी दर्शन आणि प्रभू श्री रामचंद्र, छत्रपती शिवरायांचा जयघोष अशा चैतन्यमयी वातावरणात शोभायात्रांनी गोदानगरी निनादली.

नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे काळाराम मंदिरापासून निघालेली स्वागतयात्रा झांज, लेझीम, खड्ग, लाठी-काठी शंखनाद पथकांसाह गुढी असलेला चित्ररथामुळे लक्षवेधी ठरली.

नाशिक
शोभायात्रांमध्ये विविध जिवंत देखावे, चित्ररथ सादर करण्यात आले होते. ढोल, लेझीम, शंखनाद, झांज आदी पथकांचे लयबद्ध संचलन आणि भगव्या ध्वजांसह पारंपरिक पोषाखात बांधवांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. (छायाचित्रे : रुद्र फोटो)

मधुबन कॉलनी, गणेशवाडी, इंदिरानगर भागात सकाळी पाच शोभायात्रा काढण्यात आला. त्यात गजानन महाराज मंदिर, बजरंग सोसायटी मंदिर, श्रीराम उद्यान, सप्तश्रृंगी मंदिर, कौशल्येश्वर महादेव मंदिर, विनयनगर येथून एकाच वेळी शोभायात्रा निघाल्या. अशोक मार्ग येथून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला अरण्येश्वर महादेव मंदिर येथून प्रारंभ झाला. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे माणेकशॉ नगर येथून प्रथमच स्वागत यात्रा काढण्यात आल्या. काठे गल्ली सिग्नल मारुती मंदिर येथून यात्रा काढण्यात आली.

नाशिक
मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी संस्कृतीचे दर्शन घडविले. (छायाचित्रे : रुद्र फोटो)

दंडपथकांचे संचलन आकर्षण

गुणगौरव न्यास संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे काैसल्यानगर येथून रामवाडी येथून स्वागत यात्रा काढण्यात आली. डॉ. वंदना वाघ, विधिज्ञ मेघा वराडे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. लेझम आणि दंडपथकांचे लयबद्ध संचालन यात्रेचे आकर्षण ठरले.

पाच जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष

गंगापूर रोड येथून नेरकर प्रॉपर्टीज यांच्यातर्फे निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेत पाच जिवंत चित्ररथ सहभागी झाले. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, विठू माऊली, महोदव, ज्योतिबा, मल्हारी मार्तंड अशा वेषभूषातील जिवंत चित्ररथानी लक्ष वेधले.

विविध प्रभागतील स्वागतयात्रेची संख्या

  • पंचवटी-५

  • इंदिरानगर- १९

  • नवीन नाशिक (सिडको)-५

  • अन्य -५

नाशिक
गंगापुररोड परिसरातून निघालेल्या शोभयात्रा स्वागतासाठी सहस्त्रनाद वाद्य पथक आणि सहस्त्रलक्ष्मीच्या वतीने साकारलेली भव्य पिछवाई रांगोळी आकर्षण ठरली.Pudhari News Network

पिछवाई शैलीत 2500 चौरस फूटाची रांगोळी

गंगापुररोड परिसरातून निघालेल्या शोभयात्रा स्वागतासाठी सहस्त्रनाद वाद्य पथक आणि सहस्त्रलक्ष्मीच्या वतीने साकारलेली भव्य पिछवाई रांगोळी आकर्षण ठरली. राजस्थान येथील ८०० वर्ष प्राचीन पिछवाई कला शैली प्रथमच शहरात सादर झाली. २५०० चौरस फूटी रांगोळीला १०० कलाकारांनी मूर्त रुप दिले. ३५० किलो रांगोळी, ९५० किलो रंग वापरुन ५ तासांत ती मूर्तीमंत केली गेली. अमी छेडा यांची संकल्पना तर पूजा अष्टेकर यांनी आराखडा तयार केला. संयोजिका अर्चना काळे यांच्या निरीक्षणात महेंद्र जगताप, रश्मी विसपुते, नयना रुईकर व सीमा पाठक यांनी प्रशिक्षण देण्यात आले.

नाशिक
नाशिक : हिंदू नववर्षारंभ दिन गुढीपाडव्याच्या औचित्याने रविवारी (दि. ३०) शहर व परिसरातून चित्ररथांसह शोभायात्रा काढण्यात आल्या. (छायाचित्रे : रुद्र फोटो)

घरोघरी गुढी उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत

भरजरी रेशमी महावस्त्र, तांब्याचा गडू, कडूनिबांची डहाळीवर गाठी अन‌् रांगाेळ्या फुलांनी सजवलेल्या मंगल पावन गुढी उभारुन साग्रसंगीत पूजन करत घरोघरी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक मंगलवेशभूषा परिधान करुन घरोघरी मराठी नागरिकांनी गुढी उभारत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केेला. विश्वावसु संवत्सरास प्रारंभ होणारा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण शहर व परिसरात पारंपरिक हर्षउल्हासात साजरा करण्यात आला. रविवारी (दि. ३०) पहाटेपासून घरोघरी फुले, मंगल तोरण आणि रांगोळ्यांनी सजलेल्या जागी गुढीचे पूजन करण्यात आले. घरोघरी सहपरिवार मिष्ठांन्नाचे भोजन करण्यात आले.

नाशिक
सणानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डोक्यावर मंगलकलश घेतलेल्या महिला.(छायाचित्रे : रुद्र फोटो)

गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अनेकांनी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली. त्यामुळे सकाळी अनेक मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. काहींनी सोने खरेदी करुन मंगल मुहूर्त साधला. सणानिमित्त चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे यांच्यासह अनेक मराठी महापुरुषांच्या वेषभूषा परिधान करुन शोभायात्रेत भाग घेतला. अनेक कुटुंबात नववर्षानिमित्त सत्यनारायण पूजेसह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक
पारंपरिक मंगलवेशभूषा परिधान करुन घरोघरी मराठी नागरिकांनी गुढी उभारत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केेला.(छायाचित्रे : रुद्र फोटो)
नाशिक
नववर्षानिमित्त जुन्यावर मात नाविन्यावर भर देत चैतन्यपर्व साजरा करण्याचा संदेश शोभायात्रेतून देण्यात आला (छायाचित्रे : रुद्र फोटो)
नाशिक
गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अनेकांनी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली.(छायाचित्रे : रुद्र फोटो)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news