देवळा | सरस्वतीवाडी ता. देवळा येथून चक्क कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चोरीस गेल्याने शेतकरी भयभीत झाले असून, या घटनेबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सरस्वतीवाडी येथील शेतकरी विजय झिषु आहेर यांच्या मालकीचा महींद्रा कंपनीचा लाल रंगाचा सरपंच ट्रॅक्टर क्र. ( MH-41-D-383) कांदा भरुन चाळीत उभा केलेला असतांना सोमवारी दि. ७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. मंगळवारी दि. ८ रोजी सकाळी चाळीत पाहिले असता ट्रॅक्टर दिसला नाही. विजय आहेर यांनी याबाबत आपल्या जवळच्या लोकांना सांगितले. ट्रॅक्टरची आजूबाजूला शोधाशोध सुरू केली व देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देवळा पोलिसांनी आपल्या हद्दीत ट्रॅक्टरचा शोध घ्यावा अशी मागणी ट्रॅक्टर मालक आहेर यांनी केली आहे. सद्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजार भाव मिळत असून, चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर मध्ये आजच्या बाजार भावानुसार जवळपास दीड लाख रुपयांचा कांदा भरलेला होता . या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, अशा चोरट्यांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
दहा वर्षांपूर्वी कांद्याला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल असा दर मिळत असल्याने त्यावेळी सटाणा बाजार समितीच्या आवारातुन किकवारी व धांद्री येथील शेतकऱ्यांचे कांदे भरलेले ट्रॅक्टर चोरीला गेले होते, चोरट्यांनी यातील कांद्याची परस्पर विल्हेवाट लावून ट्रॅक्कर रिकामे करून रस्त्यालगत असलेल्या खळ्यात आणून सोडले .अशा घटनांचा आजुबाजुला, तसेच शेजारच्या बाजार समित्यांमध्ये बारकाईने लक्ष ठेवून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला जावा,
कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना