

देवळा (नाशिक) : तालुक्यातील कणकापूर येथील घुबडदरा शिवार येथे बुधवार (दि.8) रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास वाघ आढळून आला. त्यामुळे परिसरातील शेतात वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कणकापूर येथील ऐतिहासिक अशा कांचन मांचन किल्ल्यालगत असलेल्या घुबडदरा शिवारात बुधवार (दि.8) रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास शेतकरी सागर शिंदे हे शेतात कांद्याना बारे (पाणी) देत असतांना त्यांना वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. शिंदे यांनी आपल्या हातातील बॅटरी लावून बघितल्यावर तो शेजारीच असलेल्या शेततळ्याजवळ वाघ उभा असतांना दिसला. त्यांनी शेत तळ्याला लावलेल्या सर्व्हेकशन जाळीत प्रवेश करून लगत असलेल्या वाघाचे छायाचित्र मोबाइलमध्ये कैद केले. त्यानंतर वाघाने या ठिकाणाहून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे ग्रमास्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांमध्ये धास्ती बसली आहे. सद्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड सुरू आहे. दुसरीकडे कांदे लावण्यासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच रात्री देखील काही मजूर हाती घेऊन कांदे लावून घ्यावे लागत आहेत. दिवसा वीज पुरवठा नसल्याने शेतकरी रात्री कांद्याना पाणी भरत असून, यात वाघ, बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने याची तत्काळ दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा ,अशी मागणी येथील शेतकरी सागर शिंदे, जगदीश शिंदे, ॲड तुषार शिंदे यांनी केली असून या घटनेबाबत नागरिकांनी वनविभाला माहिती देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.