देवळाली कॅम्प : नेहमीप्रमाणे सराव करत असताना तोफेतून सोडलेला गोळा निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी घडली. देशात अग्निवीरांच्या प्रशिक्षणादरम्यान झालेली ही पहिलीच दुर्दैवी घटना असून, याबाबत उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा उपाययोजना आणि प्रशिक्षण प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देवळाली आर्टिलरी सेंटर येथे देशभरातील अधिकारी, जवान प्रशिक्षणासाठी येतात. त्याचप्रमाणे अग्निवीरांनाही येथे तोफगोळ्याचे प्रशिक्षण दिले जाते. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास इंडियन शील्ड गन या मैदानावर फायर रेंज येथे अग्निवीर सराव करत असताना 12 तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्निवीर गोळा फायर करून लक्ष भेदत होते. यावेळी तोफ नंबर चारच्या तोंडी टाकलेला गोळा फायर केल्यानंतर लक्ष केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावरच खाली पडला. यावेळी त्याचा स्फोट होऊन गोहिल विश्वराज सिंग (20, रा. गुजरात, हल्ली मु. आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड) व शकीन शीत (21, रा. पश्चिम बंगाल, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड) या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर अप्पाला स्वामी (20), हा अग्निवीर जखमी झाला असून, त्याला सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लष्करी प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देवरे करीत आहेत.
घटनेनंतर लष्कराच्या सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, लष्करी तळावर असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना पुन्हा काटेकोरपणे तपासल्या जात आहेत.
देवळाली येथे ब्रिटिश काळापासून लष्कराच्या विविध छावण्या असून, या ठिकाणी देशातल्या तसेच देशाबाहेरील काही राष्ट्रांचे लष्करातील अधिकारी जवान तोफगोळ्यांच्या प्रशिक्षणासाठी येत असतात. आजही लष्काराशी संबंधित अनेक महत्त्वाचे विभाग येथे कार्यरत आहेत.