मनमाड/नांदगाव : खेळता खेळता काजळची छोटी गिळलेल्या एक वर्षीय बालकाला मनमाड येथील दोघा डॉक्टरांनी वेळीच उपचार करत जीवनदान दिले. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्येय मनमाडजळील पानेवाडी येथील नागरिकांना आला. (While playing, the child swallowed the kajal box)
मनमाडपासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या पानेवाडी येथील सागर काकड व कुटुंबीय रात्री जेवन करीत होते. जवळ त्याचे एक वर्षाचे बालक काजळच्या छोट्या डबीसोबत खेळत होते. खेळताखेळता बालकाने डबी गिळली. ही डबी त्याच्या घशात अडकल्याने बालक तडफडू लागले. त्यामुळे मुलाची अवस्था पाहून काकड कुटुंबीय घाबरले. काकड यांनी घशात अडकेली डबी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र डबी काढणे शक्य झाले नाही. त्यातच बालकाची प्रकृती अधिक बिघडू लागल्याने त्यांनी तातडीने मनमाडच्या आययुडीपी भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
डॉ. रवींद्र राजपूत व डॉ. विजय राजपूत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने बालकाची तपासणी केली. त्यात डबी घशाच्या मधोमध अडकल्याचे आढळून आले. डबी अडकल्यामुळे बालकाची ऑक्सिजन लेव्हल 36/37 पर्यंत खाली घसरली होती. तसेच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील काही प्रमाणात बंद झाल्याने बालकाची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी लरिंगोस्कोपचा वापर करत घशात अडकलेली डबी बाहेर काढून बालकाला जीवदान दिले. त्यामुळे पोटच्या गोळ्याला सुखरूप पाहून काकड दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सध्या बालकावर उपचार सुरू असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉ. राजपूत यांनी सांगितले. त्यानंतर पालकांनी बालकांजवळ अशा छोट्या वस्तू, नाणी, गोट्या यासारख्या वस्तू देऊ नये, तसेच त्यांच्याबाबतीत पालकांची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. राजपूत यांनी केले आहे.