

नाशिक : लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीला येत्या 28 एप्रिल रोजी दहा वर्षे पूर्ण होत असून, या दिनानिमित्त राज्य शासनाने सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत नाशिक विभागात 55 लाख 48 हजार 485 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 51 लाख 37 हजार 474 50.68 लाख अर्ज वेळेत निकाली काढले गेले. अर्जांच्या संख्येनुसार नाशिक विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिली.
नागरिकांना दैनंदिन जीवनात उत्पन्न, अधिवास, नॉन क्रिमिलेअर, जन्म-मृत्यू नोंद आदी विविध दाखल्यांची गरज भासते. यासाठी पूर्वी शासकीय कार्यालयांत वेळखाऊ प्रक्रिया पार करावी लागायची. या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 2015 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला. 28 एप्रिल 2015 पासून अंमलबजावणी सुरू झालेल्या या कायद्यांतर्गत ‘आपले सरकार’ पोर्टलवर 38 विभागांच्या 969 सेवा सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या ऑनलाइन सेवांची अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या http://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय या संकेतस्थळावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची माहिती, लोकसेवा हक्क कायदा, नियम व त्याची अंमलबजावणी, वार्षिक अहवाल आदी माहिती उपलब्ध आहे. याशिवाय, नागरिक सेतू केंद्र, आपले सरकार ई सेवा केंद्रावर जाऊन चालकाच्या मदतीने अर्ज दाखल करू शकतात. त्यासाठी शासनाने माफक शुल्क निर्धारित केलेले आहे.
या कायद्यांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात 12 लाख 15 हजार 25, धुळे जिल्ह्यात 6 लाख 75 हजार 141, जळगाव जिल्ह्यात 11 लाख 61 हजार 428, नंदुरबार जिल्ह्यात 4 लाख 77 हजार 963, तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 16 लाख 7 हजार 917 अर्ज 31 मार्च 2025 अखेर निकाली काढण्यात आले असून या पैकी 99 टक्के अर्ज हे वेळेत निकाली निघाले आहेत.
28 एप्रिल ते 12 मे 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित सर्व अर्जांचा मोहीम स्वरूपात निपटारा करणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यामुळे शासनाच्या विविध विभागांकडून अधिसूचित केलेल्या लोकोपयोगी सेवा ठराविक मुदतीत प्राप्त करून घेण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे. मुदतीत सेवा प्राप्त न झाल्यास नागरिक संबंधित कार्यालयातील प्राधिकार्यांकडे प्रथम व द्वितीय अपील करू शकतात. त्यानंतरही अर्जदारास सेवा न मिळाल्यास ते आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांच्याकडे तृतीय अपील दाखल करू शकतात.
चित्रा कुलकर्णी, आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक.