

नाशिक : दिलीप सूर्यवंशी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला बीजभांडवल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये एकूण 86 कर्जप्रकरणे प्राप्त झाली असून, यापैकी 18 मंजूर प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. 18 पैकी 16 अर्जदारांना आतापर्यंत 4 टक्के व्याजदराने 48 लाख 50 हजारांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात महामंडळाला 11 कर्जप्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी 4 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यासाठी बँकेने 11 लाख 50 हजारांची प्रकल्प रक्कम मंजूर केली आहे.
महामंडळाकडून अनुदान स्वरूपात 40 हजार देण्यात येणार असून, बीजभांडवल रक्कम 4 लाख 79 हजार 750 इतकी असणार आहे. लोकशाहीर साठे यांच्या नावाने स्थापन महामंडळाद्वारे मातंग समाजअंतर्गत असणाऱ्या 12 पोटजातींमधील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात येते. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादिक, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राघेमांग, मांग गारुडी, मादगी, मादिंगा या पोटजातींचा समावेश आहे. सध्या महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 300 कोटींपर्यंत वाढवण्यात आले आहे.
मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीला चालना देणे, सहाय्य करणे, तंतूकामाच्या व्यवसायात गुंतलेल्या मातंग समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे. समाजाच्या कल्याणासाठी शासन, संवैधानिक संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था किंवा व्यक्ती यांच्या सहयोगाने कृषी विकास कार्यक्रम, कृषी उत्पादनांचे प्रणव प्रक्रिया व त्यांचा पुरवठा, साठा, लघुउद्योग, इमारत, बांधकाम, वाहतूक आणि वैद्यकीय अभियांत्रिकी वास्तुशास्त्र इत्यादी धंदा, व्यापार करण्यासाठी कर्जयोजना किंवा तांत्रिक व्यवस्थापकीय सहाय्य देण्याची तरतूद करणे.
अठरा वर्षे पूर्ण केलेले असावे. पन्नास वर्षापेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा मातंग समाजाच्या 12 पोटजातीतील असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख असावे. अर्जदाराने इतर शासकीय उपक्रमांतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
जातीचा दाखला, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साइजचे दोन फोटो, शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स, व्यवसाय जागेच्या उपलब्धतेचा पुरावा, जागा स्वतःची नसल्यास भाडे पावती करार, वाहन खरेदी करायचे असल्यास कंपनीचे दरपत्रक, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, खरेदी करायच्या मालाचे किंवा साहित्याचे कोटेशन.