

नाशिक : सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लि. या कंपनीत रिसपॉन्सबिलिटी (युरोप) व जीईएफ (अमेरिका) या कंपन्यांनी 390 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांच्यासमवेत एफएमओ, प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या सध्याच्या गुंतवणुकदारांचाही समावेश आहे. या गुंतवणुकीचा उपयोग पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांच्या जातींच्या लागवड क्षेत्र विस्तारासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ व मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात येईल.
सह्याद्री फार्म्स फळे आणि भाजीपाल्याच्या पुरवठा साखळीमध्ये कार्यरत असलेली कंपनी असून, सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक शेतकरी कंपनीशी जोडलेले आहेत. बदलत्या व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असते. अनेक फळांमधील जुनी वाणे ही बदलत्या हवामानात आता तग धरू शकत नाहीत. तसेच ग्राहकांच्याही आवडी-निवडी बदलल्या आहेत. हे लक्षात घेऊन सह्याद्री फार्म्सने द्राक्ष व लिंबुवर्गीय पीकांच्या नवीन वाणांची आयात केली. याकरीता ग्रापा, ब्लूमफ्रेश, आयटीयूएम आणि यूरोसेमिलास यांसारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वाण निर्मिती करणाऱ्या कंपन्यासोबत भागीदारी केली आहे. यामुळे देशाच्या फलोत्पादन क्षेत्राला लाभ होईल व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या उत्पादनांचा हिस्सा वाढविण्यास मदत होणार आहे.
भारतीय शेती क्षेत्रात सह्याद्रीच्या माध्यमातून गुंतवणूक करणारे आमचे नवीन गुंतवणूकदार रिसपॉन्सिबिलीटी व जीईएफ यांचे आभार मानतो. लवकरच शेअर बाजारात आयपीओ येण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू असून, भारतात शेअर बाजारात येणारी पहिली शेतकरी-मालकीची कंपनी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
विलास शिंदे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स, नाशिक.