Nashik | गत तीन वर्षांत एसआयपीतून 37 टक्के परतावा

नाशिक : गत तीन वर्षांत एसआयपीतून 37 टक्के परतावा
एसआयपी
एसआयपीimage source - X
Published on
Updated on

नाशिक : कोरोनानंतर ऑगस्ट 2021 पासून भारतीय बाजारात एसआयपीचे जोरदार वारे वाहिले आणि नियमित एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअरबाजाराने तब्बल 37 टक्के परतावा दिल्याचे ॲम्फीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

ऑगस्ट महिन्यात गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणाऱ्या गुंतवणूकदारांना जबरदस्त धनलाभ होत असल्याचे नवे समीकरण उदयास आले आहे. निफ्टीने गेल्या आठवड्यात २५,३०० अंशांचा सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला आहे. बाजार गणेशोत्सवापर्यंत आणखी १५ टक्के वधारण्याची शक्यता आहे. परिणामी आगामी पाच वर्षांत हा परतावा टिकून राहण्याचा आत्मविश्वास विविध ब्रोकिंग फर्म्सनी व्यक्त केला आहे.

हजार रुपयांची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांनी गत तीन वर्षांत 36 हजार रुपयांची गुंतवणूक केली. तीन वर्षांत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य ५१ हजार रुपये झाले आहे. त्यांच्या खिशात बाजाराने घसघशीत 37 टक्के परतावा टाकला आहे.

गणरायाच्या आगमनावेळी दरवर्षी गुंतवणूक करणारे भारतीय गुंतवणूकदार मालामाल होत असून, पुढील पाच वर्षे बाप्पांची अशीच कृपा कायम राहणार असल्याचे विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांच्या कामगिरीच्या आकडेवारीतून दिसून येते. व्हॅल्यू फंड, ईटीएफ, लार्ज कॅप, मिड कॅप, थिमॅटिक फंड या प्रकारच्या फंडांनी जोरदार कामगिरी बजावली.

गिल्ट फंड

व्याजदर वाढीचा सर्वाधिक फायदा गिल्ट फंडात गुंतवणूकदारांना झाला आहे. सप्टेंबर 2021 पासून रिझर्व्ह बँकेने व्याजदरात टप्प्याटप्प्याने वाढ केली. मे 22 ते फेब्रुवारी 23 या कालावधीत आरबीआयने अडीच टक्क्यांनी व्याजदर वाढविल्याने गिल्ट फंडाने गत चार वर्षांत तब्बल आठ टक्क्यांनी परतावा दिला आहे. दरमहा हजार रुपये एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या 48 हजार रुपयांचे मूल्य आता 55 हजार रुपये झाले आहे. थोडक्यात गणरायांच्या साक्षीने केलेली एसआयपी लाभशीर ठरत असल्याची चर्चा सध्या गुंतवणूक क्षेत्रात होत आहे. त्यामुळे गणेश आगमनापुर्वी अनेक फंड नवीन योजना बाजारात आणत आहेत.

विघ्नहर्ता दाखवितो समृद्धीचा मार्ग

अडथळे दूर करणाऱ्या भगवान गणेशाचा सन्मान करणारा सण गणेश चतुर्थी अतिशय भक्तिभावाने साजरी होत आहे. ज्याप्रमाणे गणराया अडथळे दूर करतो, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडांमध्ये नियमित पद्धतशीर गुंतवणुकीद्वारे गुंतवणूकदार सुरक्षित आर्थिक भविष्य साकारत आहेत.

पुरेसा वित्तपुरवठा नसल्याने अनेकांना 'विघ्नांना' सामोरे जावे लागते. आर्थिक शिस्तीअभावी आर्थिक अडथळे येतात. बुद्धिमान निवडींद्वारे या आर्थिक अडथळ्यांवर मात करणे आवश्यक आहे. केवळ बचत ही आर्थिक सुरक्षिततेची हमी देत ​​नाही. कारण महागाईरूपी वाळवी बचतीचे मूल्य दिवसरात्र कमी करते. संपत्तीनिर्मितीसाठी बचतीची अर्थपूर्णरीत्या गुंतवणूक आवश्यक आहे.

टिप्स किंवा सट्टारूपी गुंतवणुकीद्वारे त्वरित नफा मिळवण्याऐवजी, म्युच्युअल फंडांमध्ये नियमितपणे गुंतवणूक करणे कधीही अधिक सुज्ञपणाचे आहे. म्युच्युअल फंडातील एसआयपी कार्यक्षमता आणि परिणामकारकता या गुणांना मूर्त रूप देतात. शेअरबाजारात कोणतीही परिस्थिती असली, तरी त्याच्यात निरपेक्ष एसआयपी नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवण्याची संधी देत असते. बाजारातील अस्थिरता आणि भावनिक निर्णय घेण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास हा शिस्तबद्ध दृष्टिकोन मदतयुक्त ठरली आहे.

सल्ल्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञाची मदत

गणरायाचे मोठे कर्ण हे एक उत्तम श्रोते होण्याची जाणीव करून देतात. आर्थिक जगतात ही जाणीव योग्य आर्थिक सल्ल्याकडे लक्ष देण्याची इच्छा दर्शविणे किंवा पात्र वित्तीय नियोजक / सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करणे यांच्याशी जोडली जाऊ शकते.

चुकांमधून शिकणे

गणेशाचे मस्तक बुद्धी आणि शिक्षणाचे प्रतीक आहे. गुंतवणुकीच्या संदर्भात या प्रतीकाचा अर्थ भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची बुद्धी आणि अधिक सूज्ञ गुंतवणूकदार होणे, असा होय.

जीवनाचे धडे

गणरायांच्या मूर्तीकडे पाहिल्यास अनेकदा त्याच्या डाव्या दाताची बाजू दुभंगलेली दिसते. पौराणिक कथेनुसार, महाभारताचे लिखाण करताना गणरायांच्या दौतीचे टोक तुटले. परंतु न थांबता गणेशाने तत्काळ आपला एक दात तोडला आणि या तोडलेल्या दाताच्या टोकाने पुढे लिखाण सुरू ठेवले. गणेशाच्या समर्पणाने महाकाव्य मिळाले. तथापि गुंतवणूक करताना अनेक जण गुंतवणुकीच्या प्रवासाचा अतिशय उत्साहाने श्रीगणेशा करतो. परंतु बाजार अस्थिर होताच एसआयपी थांबवतो.

एसआयपी (सिस्टॅमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)

एसआयपी (सिस्टॅमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे सातत्य आणि समर्पण प्रत्यक्ष कृतीत आणले जाऊ शकते. दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूकरूपी एसआयपी तुम्हाला 20 वर्षांत एक कोटी रुपये जमा करण्यात मदत करू शकते (दरवर्षी 13 टक्के चक्रवाढ दर गृहीत धरून गुंतवणुकीचे वाढलेले मूल्य. तर दरमहा 45,000 रुपये गुंतवल्यास 10 वर्षांत समान परताव्याचा दर गृहीत धरून हीच रक्कम जमा होऊ शकते)

एसआयपी सुरू करणे गरजेचे आहे. कारण काही वर्षांचा विलंब हा जमा झालेली संपत्ती लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. आपल्या सद्यस्थितीची पर्वा न करता गुंतवणुकीचा श्रीगणेशा करून आणि चक्रवाढीच्या सामर्थ्याचा स्वत:साठी वापर करत यश अन् समृद्धीचा मार्ग खुला करत उज्ज्वल आर्थिक भविष्य सुरक्षित करणे आवश्यक आहे.

सुरेश सोनी, सीईओ, बडोदा बीएनपी परिबा एएमसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news