

नाशिक : दिलीप सूर्यवंशी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, सन 2024-25 या आर्थिक वर्षात स्वाधार अंतर्गत लाभ घेण्यासाठी एकूण 847 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 28 मार्चपर्यंत 421 अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, यातील 347 अर्ज हे त्रुटी पूर्ततेअभावी विद्यार्थ्यांच्या लॉग इनवर रिव्हर्ट करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांकडून त्रुटींची पूर्तता करण्यात येत नसल्याने हे अर्ज मंजुरीअभावी रखडले आहेत.
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक, बिगरव्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुविधेच्या जागेची मर्यादा लक्षात घेता लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या संख्येने विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहतात. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे शिक्षण घेण्यास मर्यादा येतात. यासाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे.
ज्या मागासवर्गीय मुलांना मागासवर्गीय वसतिगृहात किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजनभत्ता, निवासभत्ता व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता शासनाने 6 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली. 2016-17 पासून आतापर्यंत साधारणत: 4 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
2024-25 साठी योजनेची अंतिम मुदत 16 डिसेंबर 2024 अशी होती, त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली. अर्जांची उद्दिष्टपूर्ती न झाल्याने 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 31 मार्चपर्यंत एकूण 847 अर्ज प्राप्त झाले. यातील 421 अर्ज मंजूर करण्यात आले, तर कागदपत्रांच्या त्रुटी पूर्ततेअभावी यातील 347 अर्ज हे अद्यापही रखडलेले आहेत.
1) आधारकार्ड 2) जातीचे प्रमाणपत्र 3) रहिवासी दाखला 4) बँक पासबुक 5) बँक खाते आधार संलग्न 6) अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा दाखला 7) 10/ 12 वी अभ्यासक्रमाचे मार्कशीट 8) सर्व सत्र परीक्षांचे निकालपत्र 9) शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला 10) चालू वर्षाचे बोनाफाइड 11) विद्यार्थी व पालकांचे स्वयंघोषणापत्र 12) भाडे करारनामा 13) महाविद्यालय महापालिका हद्दीपासून 5 कि.मी.च्या आत असल्याचे प्राचार्यांचे पत्र 14) उपस्थिती पत्र 15) गॅप प्रमाणपत्र 15) दिव्यांग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे पत्र
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. अर्ज करणाऱ्या परंतु अर्जाची प्रत कार्यालयात अद्याप जमा न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रत कार्यालयात त्वरित सादर करावी. तसेच विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी सेंट बॅक केलेला असल्यास त्रुटींची पूर्तता करून अर्जाची प्रत कार्यालायत सादर करावी.
देवीदास नांदगावकर, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक.