नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २९) अखेरच्या दिवशी उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन पत्र दाखल केले. जिल्ह्यातील 15 ही मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एकच झुंबड उडाली होती. दिवसभरात 255 उमेदवारांनी एकूण 312 नामनिर्देशन पत्र दाखल केले. दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी (दि. ३०) पार पडणार आहे.
पंधराव्या विधानसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली. जिल्ह्यातील 15 ही जागांसाठी उमेदवारांनी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले. जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक शहरातील तीन तसेच इगतपुरी- त्र्यंबकेश्वर या मतदारसंघांत अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी उमेदवार तसेच त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्यामुळे कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. नाशिक मध्यमधून रंजन ठाकरे (अपक्ष), गुलजार कोकणी (अपक्ष), मुशीर सय्यद (वंचित) यांच्यासह १९ जणांनी अर्ज भरले. पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, महेश हिरे (अपक्ष) यांच्यासह १७ अर्ज प्राप्त झाले. पूर्व मतदारसंघातून गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष), करण गायकर यांच्यासह इतर उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. तसेच इगतपुरीमधून काँग्रेसकडून लकी जाधव, मनसेचे काशीनाथ मेंगाळ या प्रमुखांसह अन्य उमेदवारांसह छोटे - मोठे पक्ष व अपक्षांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.
जिल्ह्यातही अखेरच्या क्षणी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. मालेगाव बाह्य मतदारसंघातून 43, तर मालेगाव मध्य मतदारसंघातून 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले. चांदवडमध्ये केदा आहेर, आत्माराम कुंभार्डे यांच्यासह २० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दिंडोरी मतदारसंघातून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांचा समावेश होता. अन्य मतदारसंघांतूनही अर्ज भरण्यासाठी चांगला प्रतिसाद लाभला. दरम्यान, जिल्ह्यामध्ये आजतागायत 361 उमेदवारांनी एकूण 506 अर्ज दाखल केले. दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी (दि. ३०) सकाळी ११ पासून त्या-त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पार पडणार आहे.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील चारही मतदारसंघांत एकच गर्दी झाली होती. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचा ताबा पोलिसांनी घेतला. यावेळी ओळखपत्र पाहून कर्मचाऱ्यांना आत प्रवेश दिला जात होता. तर उमेदवारांसमवेत केवळ चारच व्यक्तींना आत सोडले जात होते. त्यामुळे कार्यालयाच्या गेटवरच कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचा एकही प्रमुख पदाधिकारी नजरेस पडला नाही. जाधव हे अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रवाना झाल्यानंतर नाशिक पूर्व मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवारासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आगमन झाले. त्यामुळे उपस्थितांमध्ये ही बाब चर्चेेचा विषय ठरली.
मतदारसंघ..........उमेदवार.......... अर्ज संख्या
नांदगाव -34-42
मालेगाव मध्य-18-23
मालेगाव बाह्य-32-43
बागलाण-26-36
कळवण-16-22
चांदवड-22-36
येवला-31-36
सिन्नर-22-29
निफाड-19-25
दिंडोरी-23-32
नाशिक पूर्व-19-32
नाशिक मध्य-22-31
नाशिक पश्चिम-22-38
देवळाली-24-38
इगतपुरी-31-43
एकूण-361-506
--------------------