नाशिक : सकल हिंदू समाजाच्या वतीने पाळण्यात आलेल्या बंदला शुक्रवारी (दि. 16) हिंसक वळण लागल्याने पेटलेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी 300 जणांवर गुन्हे दाखल केले असून, रात्रीतून तसेच दिवसभर धरपकड करत 20 जणांना ताब्यात घेतले. तर सहा गुन्हे नोंदवित, 40 हून अधिक दंगलखोरांची ओळख पटविली.
दिवसभरात दंगलखोरांची धरपकड
सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शींचा आधार,
सहा गुन्हे दाखल; 20 ताब्यात;
40 जणांची ओळख पटली
पालकमंत्री दादा भुसे यांनी कायदा- सुव्यवस्थेचा आढावा घेतला
शुक्रवारच्या (दि. 16) बंदचे आवाहन करणारा गट जुने नाशिक भागात आल्यानंतर दुसरा गट आक्रमक झाला. बघता बघता वाद वाढल्याने दोन्ही गटांत तुफान दगडफेक केली गेली. यात पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खाडवी यांच्यासह चार युवक जखमी झाल्याचे समोर आले होते.
दरम्यान, पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर शनिवारी (दि. 17) परिस्थिती पूर्वपदावर आलेली दिसून आली. पोलिसांनी या भागात जागोजागी बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, दंगल घडविणार्या संशयितांचा शोध घेण्यास पोलिसांनी तत्काळ सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी तसेच इतर माध्यमांच्या व्हिडिओचा तपास करीत त्यातील संशयितांची ओळख पटविली. तसेच त्यातील तब्बल 20 संशयितांची रात्रीच धरपकड केली, तर अन्य 20 संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बंगालमधील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.16) सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या नाशिक बंदवेळी निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असून, आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि.17) दिली.
शहरातील घटनेच्या अनुषंगाने भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना भुसे म्हणाले, नाशिकमध्ये उद्भवलेली परिस्थिती पोलिसांनी योग्यरीतीने हाताळली. आज शहरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पण या घटनेत पाच अधिकारी व नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तसेच घटना घडली त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज व शूटिंग तपासले जात आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.
घटनेवेळी नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्याचे आदेशही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. कोणीही कायदा आणि सुव्ययस्था हाती घेऊ नये तसेच जनतेने शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले.
महंत रामगिरी महाराज यांच्या कथित वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असताना सिन्नरमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. याकडे भुसे यांचे लक्ष वेधले असता, हा कार्यक्रम आणि नाशिक बंद हा वेगळा मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांचा सिन्नर दौरा आधीच ठरल्याप्रमाणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला, तरी आपल्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याचे भान प्रत्येकाने राखावे. त्यासाठी जबाबदारीने वक्तव्य करावे, असे सल्लादेखील भुसे यांनी दिला.
समाजकंटकांवर गंभीर गुन्हे दाखल करून 20 संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासामध्ये व्हिडिओ फुटेज पाहून आरोपी निष्पन्न करून कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी.
किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-1, नाशिक शहर.