

नाशिक : जिल्हा पुरवठा विभागाकडून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील 38 लाख 57 हजार 664 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ आठ दिवसांमध्ये सुमारे 16 टक्के म्हणजेच 6 लाख 17 हजार 226 शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान विभागासमोर आहे.
जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांची संख्या जास्त असल्यामुळे शासनाने जिल्ह्याला ई- केवायसीसाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ दिली. मात्र तरीही काम पूर्ण होत नसल्यामुळे 30 एप्रिल ही अंतिम मुदत ठरविण्यात आली. त्यानंतर शिल्लक राहणार्या लाभार्थींचे अन्नधान्य वाटप बंद करण्यात येणार असल्याची घोषणा याअगोदरच शासनाने केली आहे.
स्वस्त धान्यांचा सुरळीत पुरवठा व्हावा, यंत्रणेत अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी शासनाकडून शिधापत्रिकाधारकांचे रेकॉर्ड डिजिटल प्लॅटफॉर्मवर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात पिवळे, केशरी आणि पांढरे शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या 38 लाख 57 हजार 664 इतकी आहे. यातील सुमारे 32 लाख 40 हजार 438 शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी पूर्ण झाली असून, 6 लाख 17 हजार 226 शिधापत्रिकाधारकांना केवायसीबाबत जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
ई- केवायसीबाबत उदासीन असणार्या 65 रेशनदुकानदारांची झाडाझडती घेत पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी सोमवारी (दि. २१) त्यांना कठोर शब्दांत इशारा दिला होता. ई- केवायसी पूर्ण नसल्याने या रेशनदुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सोमवारी झालेल्या सुनावणीत रेशनदुकानदारांनी 84 टक्के ई- केवायसी पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले.