

नाशिक : राज्य शासनाने 'विकसित महाराष्ट्र 2047' या दृष्टिकोनातून 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये दीर्घकालीन (2047 पर्यंत), मध्यमकालीन (राज्याच्या अमृत महोत्सवापर्यंत) आणि अल्पकालीन म्हणजे 2 ऑक्टोबर 2029 पर्यंतच्या उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यावर भर देण्यात येणार असून, 100 टक्के ई- ऑफिस प्रणाली राबविण्याचे निर्देश राज्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत.
गुरुवारी (दि. 19) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 150 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
मागील 100 दिवसांच्या कार्यकाळात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, आता नवीन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन डवले यांनी यावेळी केले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ई- ऑफिस प्रणालीबाबत मार्गदर्शन केले, तर जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
बैठकीनंतर डवले यांनी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या संदर्भातील विकासकामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहअध्यक्ष करिश्मा नायर यांनी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली.