

नाशिक : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 'एक रुपयात विमा' या योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील 107 शेतकर्यांनी शासनाला 4 कोटींना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे कृषी अधिकार्यांच्या तपासणीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 107 शेतकर्यांसोबत 2 ग्राहक सेवा केंद्रे आणि सर्व्हे करणारे कंत्राटी कर्मचारी यांच्या संगनमताने शासनाला गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या सतर्कतेमुळे 4 कोटीचा अपहार होण्यापासून वाचला आहे.
गत वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेंतर्गत शासनाकडून प्रतिहेक्टरवरील नुकसानीला 81 हजाराचे पीकविमा संरक्षण देण्यात येते. या योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील 107 शेतकर्यांनी पीक नसताना सुमारे 500 हेक्टर जमिनीवर विमा काढला. कृषी विभागाच्या निर्देशांनुसार उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकर्यांच्या पीकविमा कागदपत्रांची तपासणी सुरू असताना हा प्रकार लक्षात आला. 107 पैकी 71 शेतकर्यांनी 422 हेक्टरवरील पीकनुकसान दाखवून पीकविमा लाटण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन अर्ज दाखल करताना गटनंबर दुसर्याचा अन् अकाऊंट नंबर स्वत:चा असा बोगस प्रकार या 71 शेतकर्यांनी केल्याचे तपासणीत आढळून आले तर 36 शेतकर्यांनी त्यांच्या क्षेत्रापेक्षा अधिकचे महामंडळ आणि अकृषक क्षेत्रावरील नुकसान दाखवून पीकविमा लाटण्याचा प्रयत्न केला. विम्याचा 4 हजाराचा हप्ताही शासनाकडून भरण्यात आला. ही रक्कम या शेतकर्यांना मंजुर झाली असती तर सुमारे 4 कोटींचे नुकसान झाले असते. मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या सतर्कतेमुळे क्रॉस चेकींगमध्ये सुमारे 107 शेतकर्यांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून आले. या घटनेचा अहवाल तत्काळ तयार करून मंत्रालयीन स्तरावर पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावरुन काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.
मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकर्यांच्या कागदपत्रांची क्रॉस तपासणी सुरू असतांना ग्राहक सेवा केंद्रे अन् कंपनीचे सर्व्हे करणारे कर्मचारी यांच्या मदतीने 107 शेतकर्यांकडून 500 हेक्टर जमिनीवर पीकविमा घोटाळा सुरू असल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून ग्राहक सेवा केंद्रे आणि सर्व्हे करणारे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
भगवान गोर्गे, मालेगाव तालुका कृषी अधिकारी, नाशिक