

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालवाहतुकीसाठी विश्वासाने दिलेल्या तब्बल १ कोटी ५२ लाख ११ हजार ४६ रुपये किमतीच्या विदेशी दारूचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथून सांगलीला पोहोचविण्यासाठी पाठविलेला दारूचा माल नियोजित ठिकाणी न पोहोचविता कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे उतरविण्यात आला.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात ट्रान्स्पोर्ट ब्रोकरसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे मालवाहतुकीच्या व्यवहारातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी विजय लक्ष्मण जगताप (४५, रा. सिडको, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय गुलाबन मंगो (ट्रान्स्पोर्ट ब्रोकर, शिवा रोडलाइन्स, नाशिक), ज्योती दीपक अहिरे (रा. चांदवड, जि. नाशिक) आणि ट्रकचालक सागर कोतवाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीच्या कंपनीने दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथील पर्नाँड रिकार्ड इंडिया प्रा. लि. कंपनीतून ब्लेंडर प्राइड, १०० पायपर आणि रॉयल स्टॅग या ब्रँडच्या विदेशी दारूचे एकूण १ हजार २५८ बॉक्स ट्रकमध्ये भरून सांगली येथील एम्पायर स्टेट येथे पोहोचविण्यासाठी दिले होते.
यासाठी ज्योती अहिरे यांच्या मालकीचा २१ टन क्षमतेचा एमएच १५, एफएच ९३०० क्रमांकाचा ट्रक भाड्याने घेण्यात आला होता. मात्र, चालकाने माल नियोजित ठिकाणी न पोहोचविता दि. १४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे नेला होता आणि तेथे माल उतरविण्यात आला.
आरोपींनी परस्पर संगनमत करून विश्वासाने दिलेल्या मालाची परस्पर विल्हेवाट लावत त्याचा अपहार केला. या व्यवहारातून फिर्यादीच्या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, मालाचा अपहार नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला आणि त्याची पुढे विल्हेवाट कशी लावण्यात आली याचा तपास करण्यात येत आहे.