

नाशिक : लहान वयात आई-वडिलांचे, शालेय जीवनात शिक्षकांकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीवर युवकांची वाटचाल सुरू असते, मात्र युवावस्थेत ते एकटे पडतात. त्यांना पाहिजे तसे संस्कार मिळत नाही. त्यांना संस्काराबरोबरच कौशल्याष्ठित करण्याचे ध्येय असून त्यांना शासनाची कायमच साथ लाभेल, असे आश्वासन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित 'भोंसला'तर्फे युवक संवाद सत्रात ते बोलत होते. संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य, आमदार सीमा हिरे व्यासपीठावर उपस्थित होते.
लोढा म्हणाले, जपान दौऱ्यावर असताना तेथे व्यायाम, कसरती करणारे लोक पाहिले. आपल्याला येथील संस्कृती, परंपराची जाण नाही. मात्र, परदेशी लोकांना त्याचे महत्त्व कळले आहे. भारतीय विचार, संस्कृती, परंपरा ही महान आहे. लहानपणी आई-वडिलांचे शालेय जीवनात शिक्षकाचे संस्कार, मार्गदर्शन मिळते. मात्र, मोठेपणी युवक भरकटतात. एकटे पडतात. त्यांना संस्कार मिळत नाही, हे बदलण्याची आता गरज आहे. योग्य शिक्षणाचे संस्कार आणि प्रेरणा मिळणे, महत्त्वपूर्ण असून आज देशाची गरज आहे.
प्रा.संजय साळवे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे नाशिक विभाग कोषाध्यक्ष राहुल वैद्य, नरेंद्र वाणी, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे संचालिका डॉ. प्रीती कुलकर्णी, भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
युवकांच्या अंगी असणारे कलागुण लक्षात घेऊन आम्ही कौशल्याधिष्ठीत, स्वयंरोजगार याकडे शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे, असे सांगून मंत्री लोढा याप्रसंगी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही युवापिढीकडे आशेने पहात आहे. ही पिढी नक्कीच वेगळे करेल, असा त्यांना विश्वास आहे. सर्जनशील बुद्धीने अभिनव निर्मिती करू इच्छिणाऱ्यांसाठी आमचे शासन नेहमीच मार्गदर्शनासह मदतही करेल. यावेळी त्यांनी माजी राष्ट्रपती कै.अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले.