

लोकसभा निवडणुकीत झिरवाळ पिता- पुत्रांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचे जगजाहीर झालेले आहे. असे असतानाही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांची उमेदवारी घोषित करणे अयोग्य असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिलेला आहे, असा दावा करत तटकरेंची घोषणा म्हणजे महायुतीत समन्वय नसल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार माजी आ. धनराज महाले यांनी केली आहे.
जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरे हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघात आले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राज्यातील पहिला उमेदवार म्हणून विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्या नावाची घोषणा करून गेले, त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या महाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना फुटीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडत माजी आ. महालेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हाच आपल्याला दिंडोरी विधानसभा लढवायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे महाले सांगतात. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवत संपर्क कार्यालय सुरू करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, तटकरेंनी झिरवाळांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने महालेंची गोची झाली आहे. दरम्यान आपण कुठल्याही परिस्थितीत लढणारच तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिंडोरी विधानसभेचा आढावा सादर करणार असल्याचेही महालेंनी म्हटले आहे.
एकीकडे तटकरे यांनी झिरवाळांची उमेदवारी घोषित केलेली असताना, दुसरीकडे झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा आढावा बैठकीस उपस्थित राहात उमेदवारीची मागणी केली आहे. तटकरेंच्या नाशिक दौऱ्याला झिरवाळांची दांडी मात्र जनसन्मान यात्रेला हजेरी त्यामुळे झिरवाळांच्या मनात चाललेय तरी काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.