

दिंडोरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाचक कर्जवसुलीसंदर्भात दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करत त्यांना घेराव घातला. जुलमी पद्धतीने सुरू असलेली वसुली रोखावी, जिल्हा बँकेला शासनस्तरावरून आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी यावेळी शेतकऱ्यांची कैफियत मांडली. कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचे नाव लावण्याचा धडाका सुरू आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याप्रश्नी शासनस्तरावरून मार्ग काढावा, अशा मागणीचे निवेदन मंत्री झिरवाळ यांना देण्यात आले. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी दत्तात्रय शेळके, रघुनाथ जगताप, बाळासाहेब कामाले, माणिकराव उफाडे, जगन्नाथ भुसाळ, शालेराम काळोगे, रामदास जाधव, अण्णा पाटील, राजेंद्र महाले आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, तेव्हाच शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना घेराव घालून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार रविवारी (दि. २) मंत्री झिरवाळांना घेराव घालण्यात आला. सोमवार (दि. ३) पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात जिल्हा बँकेबाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी मुंबईत मोर्चा काढून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.