

जानोरी (नाशिक) : आमदार, विधानसभा उपाध्यक्ष पदावर गेले तरी जनतेशी नाळ जोडत जमिनीवर असलेला नेता म्हणून ओळख असलेले नरहरी झिरवाळ आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तरी आपल्या मतदारसंघातील आदिवासी विद्यार्थी यांची सहल आल्याची कळताच सकाळी सहापासून ते अकरा वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांच्या बसमध्ये प्रवास करत त्यांच्यासोबत रमत गमत त्यांना गेट वे ऑफ इंडिया, राजभवन आदी दाखवत एखाद्या गाईड सारखी भूमिका बजावत त्यांनी मुलांचा आनंद द्विगुणित केला.
गेट वे ऑफ इंडिया अन् मंत्रालय राज भवनाची माहिती घेत मुलांनी सहलीच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत सहलीचा आनंद लूटला.
अकरा वाजता मंत्री विभागाच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथी गृहावर जात त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. दिवसभर मुलांनी मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळे बघितले. त्यानंतर रात्री 'स्टेटस' या तारांकित हॉटेलमध्ये मंत्री झिरवाळ यांच्यासोबत शाही भोजनाचा आस्वाद घेतला. प्रत्येक मुलाला तू कुणाचा र.. त्यांचे बोली भाषेत सर्वांशी हितगुज करत... "अभ्यास करा मोठे व्हा... अधिकारी व्हा" असा वडीलकीचा सल्ला अन् खून आशीर्वाद झिरवाळ यांनी दिले. झिरवाळ यांच्या आपुलकीच्या प्रेमाने विद्यार्थी भारावून गेल्याचे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरुन दिसून आले.
कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित भनवड येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच मुंबई येथे जाऊन आली. दोन दिवसीय या शैक्षणिक सहलीत मुलांच्या वैज्ञानिक, सामाजिक तसेच शैक्षणिक ज्ञानात भर पडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला. मुंबईमधील प्रसिद्ध नेहरू तारांगण, म्युझियम, राजभवन, विधान भवन इत्यादी स्थळांसोबत गरम पाण्याची कुंडे असणारे वज्रेश्वरी, गणेशपुरी अशा वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेट देत मुलांनी सहलीचा आनंद लूटला.
बुधवारी (दि.8) सकाळी सहा वाजता ही सहल गेट वे ऑफ इंडिया येथे आल्याचे समजताच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी स्वतः या मुलांसोबत सहलीमध्ये वेळ दिला. गेट वे ऑफ इंडिया पासून ते राजभवनापर्यंतचा प्रवास मुलांच्या बसमधून करतानाच मुंबईमधील प्रसिद्ध ठिकाणांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. राजभवनातील इमारतींची, परिसराची तसेच त्या ठिकाणी सापडलेल्या भुयारासंबंधी विस्तृत माहिती व प्रत्यक्ष त्या भुयारातून प्रवास विद्यार्थ्यांना घडवून आणला. एवढ्या व्यस्त कार्यक्रमांमधून खास विद्यार्थ्यांसाठी एवढा वेळ दिल्याने विद्यार्थी सुखावले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद व उत्साह त्यानिमित्ताने पहावयास मिळाला.
आदिवासी भागातील मुले ज्यांनी कधी तालुका, जिल्ह्याचेही तोंड बघितले नाही अशी मुले राज्याच्या राजधानीत येऊन अगदी हरखून गेल्याचे यावेळी पहावयास मिळाले. आपली आकाशगंगा, ग्रह, तारे यांच्या विषयी माहिती देणारे 'नेहरू तारांगण' या ठिकाणी मुलांनी प्रत्यक्ष सूर्यमालेतील ग्रहांची व आकाशगंगेची माहिती घेतली.
नामदार झिरवाळ यांनी सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना विधान भवनाला भेट देण्याची संधी प्राप्त करून दिली. विद्यार्थ्यांना प्रशस्त सभागृह दाखवत सभागृहाचे कामकाज कसे चालते याविषयीची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. विधानसभा, विधान परिषद यातील फरक सांगतानाच त्यांच्या कार्याची, सभागृहातील बैठकीविषयी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल 'स्टेटस' या महागड्या हॉटेल संस्कृतीची ओळख आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना मिळाली.
दोन दिवसीय सहलीनंतर मुलांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व असा आनंद ओसंडून वाहत होता आणि "मी मुंबई पाहिली"! असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या सहलीसाठी मंत्री नरहरी झिरवाळ संस्थेचे मार्गदर्शक तथा कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी दादा, संस्था सचिव बाळासाहेब उगले, स्विय सहाय्यक अमर परुळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहलीचे नियोजन व अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक गुलाब भुसाळ , सहल विभाग प्रमुख सचिन रणदिवे तसेच डी बी शिंगाडे एम. डी. पवार, बी. पी. जाधव, बी. एस. उगले, प्रणिता आहेर, डी. एम. कावळे, ए. के. भोये यांनी परिश्रम घेतले.