

जानोरी पुढारी वृत्तसेवा | दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे राजकीय गुरू म्हणून श्रीराम शेटे यांची ओळख असून त्यांच्यामुळेच ते आमदार झाल्याचे स्वतः झिरवाळ सांगतात. मात्र पक्ष फुटित श्रीराम शेटे हे शरद पवार यांच्या सोबत तर नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या सोबत राहिले. झिरवाळ हे वारंवार शेटे हे माझ्या सोबत नसले तरी ते माझे दैवत आहे व त्यांचा दुरून आशीर्वाद असल्याचे सांगितले होते.
शेटे यांनी सुनीता चारोस्कर यांचा प्रचार केला मात्र त्यांनी झिरवाळ यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. झिरवाळ पुन्हा आमदार झाले लोकसभा निवडणूक प्रचारा वेळी मोदींच्या सभेत झिरवाळ यांनी शेटे माझे गुरू असा उल्लेख केला होता. तर विधानसभा उपाध्यक्ष झाले तेव्हा ही शेटे यांचा मार्गदर्शक गुरू असा उल्लेख केला होता. त्यामुळे झिरवाळ यांना यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याचा फोन येताच त्यांनी आपले गुरू श्रीराम शेटे यांना फोन करत मला मंत्रिपद संधी मिळाली तुम्ही शपथविधीला या..अन सर्व काही विसरून शेटे यांनी शपथविधी ला हजेरी लावत शिष्याला शुभेच्छा देतानाच आता राज्याची जी जबाबदारी मिळाली तिचे सोन करा जनतेचे काम करा असा सल्ला देतानाच अजून मोठे पदावर जा असा आशिर्वाद दिला. झिरवाळ यांनी शपथ पूर्ण करताना जय श्रीरामचा नारा देत गुरूला गुरू दक्षिणा दिली.